सोसायट्यांनी सक्षम होण्यासाठी स्वत:चे उद्योग सुरू करावेत

सोसायट्यांनी सक्षम होण्यासाठी स्वत:चे उद्योग सुरू करावेत
सोसायट्यांनी सक्षम होण्यासाठी स्वत:चे उद्योग सुरू करावेत

सातारा : सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात कमीत कमी दहा नवीन विविध कार्यकारी सोसायट्यांची निर्मिती व्हावी, अस्तित्वात असणाऱ्या सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी स्वत:चे उद्योग सुरू करावेत, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नुकतीच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा आढावा सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी घेतला. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील कमीत कमी ५०० सोसायट्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहायक निबंधकांनी किमान १० सोसायट्या नावीन्यपूर्ण आणि सक्षमकरण्याबाबत लक्ष केंद्रित करावे. यातून गावातील पैसा गावातच फिरेल व तेथील तरुणांना बाहेरगावी रोजगारासाठी न जाता त्यांना गावातच रोजगार उपलब्ध होईल.  सावकारीबाबतचे शासनाचे निकष, व्याजदर याबाबत जिल्हा आणि तालुका स्तरावरून जनजागृती करावी. परवानाधारक सावकार मर्यादेपेक्षा जास्त व्याज देतायत याची कसून चौकशी करावी. दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. माण आणि पाटण येथील संस्थांचे ६० टक्के लेखापरीक्षण झाले आहे. हे प्रमाण खूप कमी आहे. ज्या संस्था लेखापरीक्षण करत नाहीत त्यांना नोटिसा देऊन कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी पीककर्जाचे २७५० कोटींचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना ७८ टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्जवाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आघाडीवर आहे. राष्ट्रीय बॅंकांचे कर्जवाटपाचे प्रमाण कमी आहे. यासाठी आपल्या सोसायट्या सक्षम करा. सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ व तत्काळ कर्ज मिळून जाईल.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे १ लाख ४७ हजार ७१२ तर राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, व्यापारी बॅंकांचे १० हजार २७४ असे एकूण १ लाख ५७ हजार ९८६ लाभार्थ्यांना एकूण ३५२.३५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजार समित्यांमध्ये १०० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा. बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात शेतीमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या मालाची थेट विक्री झाली पाहिजे, त्यांची कोठेही फसवणूक केल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीच्या वेळी बावधन विविध कार्यकारी सोसायटीने तयार केलेल्या ‘वाई गोल्ड’ या हळदीच्या ब्रँडचे उद्घाटनही मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com