काँग्रेस पक्षाची आजही आणीबाणीसारखीच मानसिकता : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : न्यायसंस्थेला घाबरवण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणाऱ्या काँग्रेस पक्षाची मानसिकता आजही आणीबाणीच्या काळासारखीच आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकशाहीवरील निष्ठा मजबूत राखण्यासाठी इतिहासातील आणीबाणीच्या काळ्या अध्यायाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

तत्कालीन काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या काळ्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी भाजपने मंगळवारी (ता.२६) मुंबई येथे  ‘१९७५ आपातकाल – लोकतंत्र की अनिवार्यता, विकास मंत्र लोकतंत्र’  या विषयावर जनसंवादाचे आयोजन केले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कार्यक्रमाचे निमंत्रक मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की १९७५ मध्ये लादलेली आणीबाणी म्हणजे एखाद्या परिवारासाठी घटनेचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो याचे दुर्मिळ उदाहरण आहे. काँग्रेसने आणीबाणीत देशातील न्यायसंस्थेला भयभीत केले. एका परिवाराच्या सत्ता सुखासाठी न्यायसंस्थेचे अवमूल्यन करून त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला. आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची ही मानसिकता आजही कायम आहे. काँग्रेसने न्यायसंस्थेला धमकावण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात क्षुल्लक कारणांवरून महाभियोग दाखल केला. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. लोकशाहीबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचे आणि संविधानाबद्दलच्या समर्पित वृत्तीचे सातत्याने स्मरण करण्याची गरज आहे. लोकशाहीवरील आपली निष्ठा मजबूत रहावी, यासाठी आणीबाणी हा इतिहासातील काळा अध्याय कधीही विसरता कामा नये.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की काँग्रेसने आणीबाणी लादून देशातील लोकशाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण जनता झुकली नाही. असंख्य कार्यकर्त्यांनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याचा विजय म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे. त्या दिवसाचे स्मरण आवश्यक आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान वाचविणार म्हणतो, पण देशाच्या संविधानाला सर्वाधिक धोका काँग्रेस व त्या पक्षाच्या साथीदारांचाच आहे. देशातील लोकशाही व संविधान संपविण्याचा प्रयत्न कोणी केला हे पुढच्या पिढीलाही समजण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com