भंडारा जिल्ह्यात खासगी खरेदीदारांकडून दुधाला कमी दर

माझ्याकडे म्हशी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाची विक्री गावातच खासगी व्यक्‍तींना केल्यास सरासरी ३० रुपये लिटरचा दर मिळतो. हेच दूध भंडारा येथे विक्रीसाठी नेले तर लिटरमागे तीन-चार रुपये जादा मिळतात. परंतु वाहतूक खर्च वाढतो. - मुकेश वाणवे, पांजरा, ता. मोहाडी, जि. भंडारा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा  ः पूर्व विदर्भात दूध संकलनात आघाडीवर असलेल्या भंडारा जिल्ह्यात दूध संघाचा अपवाद वगळता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधापोटी योग्य परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे. सहकारी दूध संघाकडून २२ रुपये लिटरने गाईच्या दुधाची खरेदी होत असताना खासगी खरेदीदारांकडून मात्र अवघा १७ रुपये लिटर असा दर दिला जात आहे.

पूर्व विदर्भात धान उत्पादक असलेल्या जिल्ह्यात पूरक व्यवसायाच्या ओढीने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला पसंती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण दूध संकलन १ लाख लिटरपेक्षा अधिक होऊ लागले आहे. यातील ७० हजार लिटर दुधाची खरेदी भंडारा जिल्हा सहकारी दूध संघाकडून होते. यातील ५० हजार लिटर दूध हे गाईचे तर उर्वरित २० हजार लिटर दूध हे म्हशीचे असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी दिली.

दरम्यान, शासनाने म्हशीच्या दुधासाठी पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेतला होता. परंतु याला भंडारा दूध संघाने विरोध केला आहे. गाईसोबतच म्हशीच्या दुधाला अनुदान देण्याची मागणी संघाची आहे. त्यासोबतच थेट दूध उत्पादकांच्या खात्यात ही रक्‍कम न टाकता अनुदान रक्‍कम दूध संघाकडे सोपवावी व त्यांच्या माध्यमातून हे वाटप व्हावे, अशीही मागणी आहे. फॅटच्या प्रमाणानुसार गाईच्या दूधाला २२ तर म्हशीच्या दुधाला ३४ रुपये लिटरचा दर दिला जातो. ७० हजार लिटरपैकी दररोज सरासरी २५ ते ३० लिटर दूध शिल्लक राहते. त्यावर प्रक्रिया करून पावडर केली जाते. त्याची विक्रीदेखील संघ करतो, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दूध संकलन वाढल्याने खासगी खरेदीदारदेखील तयार झाले आहेत. त्यांच्याकडून दूध उत्पादकांची पिळवणूक केली जाते. त्यांच्याकडून १७ रुपये लिटर दर गाईच्या दुधाला दिला जातो तर ३० रुपये लिटरनेच म्हशीच्या दुधाची खरेदी होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com