शेतमाल खरेदी केंद्रे कधी सुरू होणार; शेतकऱ्यांचा सवाल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी शासनाने आता ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. थेट खरेदी केंद्रावर जाऊन शेतीमाल घालता येणार नाही. प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर खरेदी केंद्रावर कोणत्या दिवशी शेतीमाल घेऊन जायचे याबाबत कळविले जाणार आहे.

हमीभावासाठी अजून ऑनलाइन नोंदणीच सुरू झालेली नाही. त्यामुळे खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सोयाबीन, मूग, उडीद या शेतीमालाचे दर बाजारात कमी झाले आहेत. हमीभावापेक्षाही हजार ते दोन हजार रुपये कमी दर मिळत आहे.

सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ५० रुपये आहे, पण प्रत्यक्षात बाजारात २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. उडदाचा हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. पण बाजारात २ हजार ५०० ते ३ हजार रुपये भाव आहे. मुगाचा हमीभाव ५ हजार ५७५ रुपये आहे. मात्र बाजारात ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये भाव आहे. सोयाबीन, मूग, उडादाला किमान आधारभूत किंमतही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रथम नोंदणी, नंतर खरेदी बाजारात हमीभावापेक्षा कमी दर आल्यास शासन नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करते. संबंधित पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबूक झेरॉक्‍स घेऊन खरेदी केंद्रावर गेल्यावर शेतीमाल खरेदी केला जायचा. पण आता शासनाने प्रथम नोंदणी व नंतर खरेदी ही पद्धत सुरू केली आहे. खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून नोंदणी खरेदी केंद्र चालविणाऱ्या खरेदी-विक्री संघाच्या (संस्थेच्या) माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नाफेडमार्फत खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थेच्या संगणकावर अथवा मोबाईलवर नोंदणी ॲप डाऊनलोड केले जाणार आहे.

शेतकऱ्यांनी प्रथम या संस्थेकडे जाऊन शेतीमालाची माहिती, त्या पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबूक झेरॉक्‍सची ॲपद्वारे नोंदणी करायची आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील मूग, उडीद अथवा तूर कोणत्या दिवशी खरेदी केंद्रावर आणायचे हे कळवले जाणार आहे. त्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल खरेदी केंद्रावर न्यायचा आहे. मात्र अद्याप ऑनलाइन नोंदणीच सुरू झालेली नाही. त्यामुळे खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना हमीभावात विक्री करण्यासाठी अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढे यावे. तरच हमीभाव मिळणार आहे. - प्रशांत शेजाळ, सभापती, सांगली उत्पन्न बाजार समिती सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com