शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’

शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’

पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न झालेली खरेदी आणि गुलाबी बोंड अळीच्या तडाख्यात सापडलेली कपाशी अशा विचित्र अवस्थेतून राज्याच्या खरीप हंगामाचा शेवट होतो आहे. शासनाने किमान आता तूर खरेदीच्या नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. उत्पादन घटूनही १२ लाख टन खरीप तूर बाजारात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खरीप उत्पादनातील या अडचणी विचारात घेत बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादकांना मदत देणे तसेच हमीभाव केंद्रांवर थकलेल्या कोट्यवधी रुपयांचे चुकारे अदा करणे, असे दोन उपाय सरकारने तातडीने केल्यास शेतकऱ्यांच्या 'खरीप वेदना' कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्याच्या खरीप हंगामात आता तूर, मका, धान, सोयाबीन आणि कापूस हीच प्रमुख पिके बनली आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्यत्वे खरीप धान, सोयाबीन आणि कपाशीवर अवलंबून असते. यंदा खरिपात या तीनही पिकांचे उत्पादन घटण्याचे संकेत मिळत आहेत.

अनियमित पावसामुळे खरीप पिकांची यंदा काही भागांत दैना झाली. राज्यात खरिपाच्या तोंडावर पावसाने चांगली सलामी दिली आणि पेरण्यादेखील वेळेवर सुरू झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. राज्याच्या काही भागांतील खरीप पिकांना २० ते २५ दिवस, तर काही भागांना ६०-६५ दिवसांपर्यंत पावसाने खंड दिला, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची यंदा कपाशीवर भिस्त होती. त्यामुळेच राज्यात सोयाबीनखालील तीन लाख हेक्टर क्षेत्र कमी करून ते कपाशीकडे वळते झाले. गेल्या हंगामात ३८ लाख हेक्टरवर कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने ४२ लाख हेक्टरपर्यंत लागवड केली. परंतु, यातील २० लाख हेक्टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे पांढऱ्या सोन्याची अनेक गावांमध्ये माती झाली.

विदर्भासह राज्यात धानाचे क्षेत्र एक लाख हेक्टरने कमी झाले. पुरेसा पाऊस नसल्यामुळे उत्पादकतादेखील घटली आहे. गेल्या खरिपात प्रतिहेक्टरी २३७५ किलो धानाचे उत्पादन झाले होते; मात्र यंदा हेच उत्पादन १८४१ प्रतिकिलो इतके कमी मिळू शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

खरीप कडधान्याच्या उत्पादनातदेखील मोठी घट अपेक्षित आहे. तुरीचे उत्पादन यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत तीन लाख टनाने घटू शकते. यामुळे सरकारी खरेदीच्या नियोजनाला वाव आहे. जानेवारीपासून बाजारात येणाऱ्या तुरीची खरेदी नियोजनपूर्वक झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान मर्यादित राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लातूर बाजार समितीचे माजी संचालक अशोक अग्रवाल म्हणाले, की यंदा खरिपात सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. पावसाचा खंड राहिल्यामुळे सोयाबीनच्या शेतात एकरी सरासरी १२-१२ क्विंटलऐवजी ८-९ क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांना मिळतो आहे. शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्यामुळे उडदाचेदेखील नुकसान झाले आहे.

पावसाचा खंड, बोंड अळी ठरल्या मुख्य समस्या 'राज्याच्या मावळत्या खरीप हंगामावर नजर टाकल्यास पावसाचा खंड आणि बोंड अळी या मुख्य समस्या ठरल्या आहेत. मूग, उडीद उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत निम्म्याने घट आहे. पावसाचा खंड जास्त असल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली होती. मधल्या टप्प्यात पाऊस चांगला झाल्याने कपाशीची वाढ जोमात झाली. मात्र, गुलाबी बोंड अळीचे अनपेक्षित असे मोठे संकट आले. त्यामुळे कापूस उत्पादन घटणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. एस. एल. जाधव यांनी दिली.

राज्यातील प्रमुख खरीप पिकांचे अंदाजे उत्पादन
पिकाचे नाव खरीप हंगाम २०१६ खरीप हंगाम २०१७
धान ३६.९४(१५.५६) २६.६३(१४.४७)
ज्वारी ४.९५(४.९२) ४.७०(४.१०)
बाजरी ८.४३(८.४५) ४.९४(६.८०)
मका २९.३३(९.२१) २३.५७(९.१४)
तूर २०.३५(१५.३३) ११.०८(१२.२९)
मूग ३.००(५.११) १.६३(४.५३)
उडीद २.५०(४.४५) १.७७(४.८४)
सोयाबीन ४६.२३(३९.७६) ३५.९८(३८.४१)
कापूस १०६.१५(३८.००) ९५.३६(४२.०७)

#पिकाच्या उत्पादनाचे आकडे लाख टनांत आहेत #कापूस उत्पादनाचे आकडे लाख गाठींमध्ये दर्शविले आहेत (प्रतिगाठ १७० किलो) #कंसातील आकडे लागवड क्षेत्राचे असून, आकडे लाख हेक्टरमध्ये आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com