उस्मानाबादमध्ये मूग, उडदाची उत्पादकता सर्वांत कमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
औरंगाबाद : मराठवाड्यातील उडीद व मुगाच्या पिकात सर्वांत कमी उत्पादकता उस्मानाबाद जिल्ह्यात आली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडाने उडीद, मुगाचे मोठे नुकसान केले असून, कसेबसे हाती आलेल्या सोयाबीन, कपाशीलाही परतीच्या पावसाने मोठा फटका दिला आहे.
 
यंदाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची शेती आतबट्ट्याचीच झाली आहे. मराठवाड्यात यंदा सरासरी ४९ लाख ११ हजार हेक्‍टरपैकी ४७ लाख ६८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली.
 
प्रत्यक्ष पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये २ लाख ७९ हजार हेक्‍टरवर मका, १ लाख ३५ हजार हेक्‍टरवर बाजरी, १ लाख ५५ हजार हेक्‍टरवर खरीप ज्वारी, ४ लाख ९८ हजार हेक्‍टरवर तूर, १ लाख ८८ हजार हेक्‍टरवर मूग, १ लाख ८२ हजार हेक्‍टरवर उडीद, १७ लाख २१ हजार हेक्‍टरवर सोयाबीन, तर १५ लाख ९१ हजार हेक्‍टरवर कपाशीची पेरणी झाली होती. त्यापैकी मूग, आणि उडदाची काढणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. 
 
कृषी विभागाच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यात उडीद व मुगाची उत्पादकता सर्वांत कमी आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी सरासरी १११.३० किलो आली असून, उडदाची उत्पादकता १२७.९० किलो हेक्‍टरी आली आहे.
 
जिल्हानिहाय हेक्‍टरी सरासरी उत्पादकतेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात मुगाची उत्पादकता ३२८.९ किलो, जालना जिल्ह्यात १७७.९८ किलो, बीड २६६.८९ किलो, लातूर १८२ किलो, नांदेड ३८६ किलो, परभणी जिल्ह्यात १७०.९० किलो तर हिंगोली जिल्ह्यात २४३ किलो हेक्‍टरी आली आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील ३९ हेक्‍टरवरील उडदाचे क्षेत्र पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे मोडावे लागले. औरंगाबादमध्ये उडदाची उत्पादकता ६८५.५४ किलो हेक्‍टरी आली.
 
इतर जिल्ह्यांमध्ये उडदाच्या हेक्‍टरी उत्पादकतेनुसार जालना जिल्ह्यात  ३६३.७४ किलो, बीड ४०८.८४ किलो, लातूर २३० किलो, नांदेड ४९४ किलो, परभणी २४० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात ३४४.६० किलो हेक्‍टरी आली आहे. यंदा खरिपातील मूग आणि उडदाच्या उत्पादकतेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचेच काम केले आहे.
मका उत्पादनात घटीचा अंदाज
यंदा मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत मकाच्या पिकात मोठ्या घटीचा अंदाज आहे. पक्‍वतेच्या अवस्थेतील मका पिकाची काढणी सद्यःस्थितीत सुरू आहे. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत मकाच्या उत्पादनात सरासरी २० ते २२ टक्‍के घटीचा अंदाज असला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सोयगाव व गंगापूर तालुक्‍यांत मकाचे उत्पादनात सर्वाधिक ४० ते ५० टक्‍के अाणि त्यापेक्षाही अधिक घटीचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com