जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर

जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर

जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून साडेनऊ टक्केही साठा नसल्याचे चित्र आहे. गिरणा, वाघूर व हतनूरमधील जलसाठा संपण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पारोळा, जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत.  जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्‍यात सातपुडा पर्वतालगत सुकी, अभोरा व मंगरूळ प्रकल्पांत अनुक्रमे ४०, ४५ व ४० टक्के जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातील साठा १४ टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या सीमेवरील अनेर प्रकल्पात सुमारे ३५ टक्के जलसाठा आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पातही साठा १५ टक्केच आहे. जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, पारोळामधील बोरी, एरंडोलातील अंजनी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. हिवरा व अग्नावती प्रकल्पातील साठाही अनुक्रमे १ व ५ टक्केही राहिलेला नाही.  धुळ्यात शिंदखेडा व धुळे तालुक्‍यांत स्थिती बिकट आहे. तर नंदुरबारात नंदुरबार, नवापूर भागातील प्रकल्प कोरडे आहेत. हतनूरमधील जिवंत साठा संपला आहे. हतनूर प्रकल्पावर जळगावमधील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, रेल्वेच्या वसाहती, दीपनगर येथील औष्णीक वीजप्रकल्प आदी बाबींना पाणीपुरवठा करण्याचा भार आहे. गिरणा प्रकल्पातील साठाही १० टक्‍क्‍यांखाली आहे. तर वाघूरमधील साठाही १२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. गिरणा प्रकल्पातून पाचवे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. धुळे जिल्ह्यात करवंद, मालनगाव प्रकल्पांतील साठा ३१ टक्‍क्‍यांखालीच आहे. तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमधील साठा ३० टक्‍क्‍यांवर आहे. बुराई प्रकल्प कोरडाठाक आहे. पांझरा प्रकल्पातील साठाही ३० टक्‍क्‍यांखाली आहे. नंदुरबारमधील दरा प्रकल्प कोरडाठाक झाल्याची स्थिती आहे. तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा ४० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील एकूण साठा साडेनऊ टक्‍क्‍यांखाली आला आहे. लहान तलाव, लहान प्रकल्प कोरडे झाल्याचे चित्र आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com