गुणवत्तेच्या नावाखाली दूधदर कपातीचा प्रस्ताव

दूध
दूध

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना दूध दर मिळण्यासाठी संघांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले होते. मात्र, आता दुधाची गुणवत्ता टिकावी, या कारणासाठी कमी एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आणला आहे, याबाबत लवकरच शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरण्याची चिन्हे आहेत.   पिशवीबंद दूध वगळून गायीच्या उर्वरित दुधाला ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ व त्यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या दूध रूपांतरणास ५ रुपये अनुदान देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना ३.२ टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधाला २४ रुपये १० पैसे दर देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये १९ रुपये १० पैसे रुपये दूध संस्थेचे तर ५ रुपये शासन अनुदानाचा समावेश असणार आहे. ३.३ टक्के फॅटच्या दुधास २४ रुपये ४० पैसे (१९ रुपये ४० पैसे व ५ रुपये अनुदान), ३.४ टक्के फॅटच्या दुधास २४ रुपये ७० पैसे व (१९ रुपये ७० पैसे व ५ रुपये अनुदान) आणि ३.५ टक्के फॅट गुणवत्तेच्या दुधास २५ रुपये (२० रुपये व ५ रुपये अनुदान) प्रतिलिटर असा दर देणे बंधनकारक राहील.  दूध प्रकिया संघांकडील पिशवीबंद दुधाला हे अनुदान असणार नाही. हे अनुदान दूधपुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ ऑगस्ट २०१८ पासून २५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर दिला जात असल्याचे हमीपत्र संबंधित प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक करण्यात आले होते, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दरात दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच सरकारने दर कपातीचा नवा प्रस्ताव आणला असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.  या प्रस्तावानुसार आता ८.४ एसएनएफ असलेल्या दुधाच्या दरात १ रुपयांनी कपात करण्यात येणार आहे. तर ८.३ एसएनएफपेक्षा कमी गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रतिलिटर ५० पैसे अधिक दर कपात करण्यात येणार आहे. दुधाची गुणवत्ता टिकावी व भेसळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असून शेतकऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com