‘महालक्ष्मी सरस’मधून ग्रामीण जनतेची समृद्धी : राज्यपाल

‘महालक्ष्मी सरस’मधून ग्रामीण जनतेची समृद्धी : राज्यपाल
‘महालक्ष्मी सरस’मधून ग्रामीण जनतेची समृद्धी : राज्यपाल

मुंबई : एक महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते, तेव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते. तेव्हा राज्यातील सर्व एअरपोर्ट, रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावर महालक्ष्मी सरसचे स्टॉल सुरू करावेत, अशी सरकारला सूचना करून महालक्ष्मी सरस हे निव्वळ प्रदर्शन नाही तर हा गरीब, वंचित ग्रामीण जनतेसाठीचा खरा समृद्धीचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी (ता. १७) केले.

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०१८ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी ग्राम विकास व महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार पूनम महाजन, आमदार तृप्ती सावंत तसेच ग्राम विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नाबार्डचे एच आर दवे, आर. विमला आदी उपस्थित होते. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राउंडवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी राज्यपाल राव म्हणाले, की एक महिला शिकते, तेव्हा एक घर साक्षर होते. तसेच एक महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते, तेव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची उलाढाल एक कोटी रुपयांवरून, सहा कोटी रुपये इतकी, वाढली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण आज अॅमॅझोन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या आपल्याच देशातील विविध वस्तू ऑनलाइन विकून हजारो कोटी रुपये कमावत आहेत. त्यामुळे महालक्ष्मी सरसने आता किमान शंभर कोटी रुपये, इतके ध्येय ठेवले पाहिजे. प्रत्येक मॉल तसेच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये महालक्ष्मी सरसची उत्पादने वर्षभर उपलब्ध झाली पाहिजे. येथील सर्व पदार्थ, तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग झाले पाहिजे. त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला तसेच कारागीर यांना योग्य आर्थिक मोबदला मिळेल. तसेच राज्यातील प्रत्येक एअरपोर्ट, रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावर महालक्ष्मी सरसचे स्टॉल सुरू करावेत. महालक्ष्मी सरस हे निव्वळ प्रदर्शन नाही. तर महालक्ष्मी सरस हा गरीब लोकांसाठी ग्रामीण जनतेसाठी व आदिवासी लोकांसाठी खरा समृद्धीचा महामार्ग आहे. या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी ग्राम विकास विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की स्वयंसाह्यता गटाच्या व स्वरोजगारीच्या उत्पादनाची प्रसिद्धी व विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी मुंबईत दरवर्षी डिसेंबर महिन्यात सन २००३ पासून महालक्ष्मी सरस नावाने व्यापक प्रमाणात विक्री व प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात सुरवातीस ५०० कारागिरांच्या सहभागापासून सुरवात होऊन मागील वर्षी सुमारे २००० हून अधिक कारागीर सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे विक्रीही १ कोटीवरून वाढत जाऊन ७ कोटींहून अधिकपर्यंत झाली. या वर्षी प्रदर्शनात महाराष्ट्रासह २८ राज्यांतील सुमारे २००० ते २२०० कारागीर सहभागी झाले आहेत. राज्य शासनाने बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असून, राज्यात आतापर्यंत ४ हजार ६६२ बचत गटांना याचा लाभ झाला आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी या वेळी दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५२ लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरित करण्यात आले आहे. यापुढील काळातही या योजनेला चांगली गती दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिला बचत गटांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमानंतर राज्यपालांनी प्रदर्शनातील उत्पादनांची माहिती घेत महिला बचत गटांचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com