कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद
कर्जमाफीसाठी १५ हजार कोटींची तरतूद

नागपूर : सोमवारपासून (ता.११) येथे सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारने २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळापुढे सादर केल्या. यात सरकारच्या महत्त्वकांक्षी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

दरम्यान, राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून विधिमंडळ अधिवेशनात रेकॉर्ड ब्रेक पुरवणी मागण्या सादर होत आहेत. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने तब्बल एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी आणि आता १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत आता सहकार विभाग १३ हजार कोटी आणि सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागातून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ शेतकरी आणि यंत्रमागधारकांना दिल्या जात असलेल्या वीज सवलतीपोटी महावितरणला २९७२ कोटी देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत कामे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या, सुरू असलेल्या आणि प्रस्तावित रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे.

फळ पीकविमा योजनेसाठी राज्य हिस्सा म्हणून ४३३ कोटी रुपये आणि मनरेगाअंतर्गत १०० दिवसांवरील मजुरीसाठी ४०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी वीज पंपांना वीजजोडणी देण्याबाबतच्या विशेष योजनेसाठी १५४ कोटी आणि राज्यातील सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्यासाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर २६ हजार ४०२ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी प्रत्यक्षात निव्वळ आर्थिक भार हा २१ हजार ९९४ कोटी इतका आहे. म्हणजेच ही रक्कम सरकारला कर्ज काढून उभी करावी लागणार आहे.

विभागनिहाय तरतूद सहकार - १४२४० कोटी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग - ३४९३ कोटी, जलसंपदा - १३१८ कोटी, ग्रामविकास - १२१७ कोटी, आदिवासी विकास - ११२९ कोटी, सार्वजनिक आरोग्य - ८५० कोटी, सार्वजनिक बांधकाम - ७८४ कोटी, महसूल व वन विभाग - ५२० कोटी, कृषी व पदूम - ४६९ कोटी, नियोजन - ४६५ कोटी, महिला व बाल कल्याण - ४४६ कोटी, कौशल्य विकास - २९७ कोटी, नगर विकास - २३२ कोटी

तीन वर्षांतील पुरवणी मागण्यांची आकडेवारी डिसेंबर २०१४ - ८ हजार २०१ कोटी मार्च २०१५ - ३ हजार ५३६ कोटी जुलै २०१५ - १४ हजार ७९३ कोटी डिसेंबर २०१५ - १६ हजार कोटी ९४ लाख मार्च २०१६ - ४ हजार ५८१ कोटी जुलै २०१६ - १३ हजार कोटी डिसेंबर २०१६ - ९ हजार ४८९ कोटी मार्च २०१७ - ११ हजार १०४ कोटी जुलै २०१७ - ३३ हजार ५३३ कोटी डिसेंबर २०१७ - २६ हजार ४०२ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com