पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकन

क्वाॅलिटी मार्कचे मानांकन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) उत्पादनांना मिळाले आहे.
क्वाॅलिटी मार्कचे मानांकन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) उत्पादनांना मिळाले आहे.

पुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बाेर्डाच्या (एनडीडीबी) वतीने देण्यात येणारे क्वॉलिटी मार्कचे मानांकन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) उत्पादनांना मिळाले आहे. मानांकनाचे प्रमाणपत्र ‘एनडीडीबी’चे प्रादेशिक विभागाचे प्रमुख अनिल हातेकर यांनी शुक्रवारी (ता. २०) संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांना प्रदान केले.   मानांकन मिळालेले पुणे जिल्हा संघ पहिला असून, राजाराम बापू संघाला देखील हे मानांकन मिळाले असून, राज्यातील आणखी सात संघांनी अर्ज दाखल केले आहेत.  या मानांकनाबाबतची माहिती देताना ‘एनडीडीबी’चे प्रादेशिक विभागप्रमुख अनिल हातेकर म्हणाले, की देशभरात दूध भेसळीचा गंभीर प्रश्‍न बनला आहे. फुड सेफ्टी स्टॅंडर्डचे आयएसआे असतानादेखील भेसळयुक्त दूध आढळून येत आहे. यामुळे डेअरी विकास बाेर्डाने गेल्या तीन वर्षांपासून क्वाॅलिटी मार्क देण्याचे जाहीर केले. यानुसार महाराष्ट्रातील सात संघानी अर्ज केले हाेते. त्यानुसार विविध संघाची पाहणी करण्यात आली. या वेळी मशिनरीमध्ये काही बदल आम्ही सुचवले हाेते. त्यानुसार पुणे जिल्हा दूध संघाने बदल केले. त्यानंतर या संघाच्या उत्पादनांना क्वाॅलिटी मार्क मानांकन देण्यात आले आहे. हे मानांकन दिल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी आम्ही अचानक भेट देऊन उत्पादनांचा दर्जा तपासणार आहाेत. या तपासणींमध्ये दर्जा खालावलेला असल्यास मानांकन रद्द करण्यात येणार आहे. तर प्रत्येक तीन वर्षांनी नव्याने मानांकन घ्यावे लागणार आहे.  दूध संघाचे अध्यक्ष हिंगे म्हणाले, की कात्रज दूध संघाच्या विविध १२१ उत्पानांचा दर्जा राखण्यासाठी १४७ प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. यासाठी संघाला आयएसआे २००५ मिळाले असून, २०१५ साठी आम्ही अर्ज दाखल केला आहे. उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठीच्या विविध उपाययाेजनांमुळे आम्हाला ‘एनडीडीबी’च्या क्वॉलीटी मार्कचे मानांकन मिळाले आहे. या मानांकनाचा लाेगाे आम्ही सर्व उत्पादनांवर लावल्यामुळे विपणनासाठी अधिक फायदा हाेणार आहे. भविष्यात मनुष्यरहित स्वंयचलीत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. या वेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षिरसागर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित हाेते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com