जळगाव : तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रांना नापसंती

तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रांना नापसंती
तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रांना नापसंती

जळगाव : शासकीय केंद्रात तूर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे बाजार समिती, खासगी बाजारात तुरीचे दर दबावात आहेत. हमीभावापेक्षा सुमारे ९०० ते १००० रुपये कमी दर मिळत आहेत.  

जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरवातीलाच म्हणजेच फेब्रुवारीतच सुरू झाली. यातील जळगाव केंद्रात शून्य खरेदी झाली. अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, जामनेर व मुक्ताईनगर येथेही आवक कमीच आहे. हेक्‍टरी चार क्विंटल ५० किलो तूर खरेदीचा निकष असल्याने इतर केंद्रातही कमीच खरेदी होत असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. कारण बागायती तुरीचे उत्पादन हेक्‍टरी २० क्विंटल आहे. यातील फक्त साडेचार क्विंटल तूर शासन घेत असल्याने शासकीय केंद्रातील आवक नगण्य आहे. 

रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव भागातील केंद्रांमध्ये प्रतिदिन ३० ते ४० क्विंटलही आवक होत नाही. नेमकी किती खरेदी शासकीय केंद्रात आजपर्यंत झाली, याची नेमकी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांकडून मिळू शकली नाही. 

बाजारात जळगाव, चोपडा येथे तुरीची कोणतीही आवक या हंगामात झाली नाही. रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, पाचोरा व चाळीसगाव येथे मागील महिन्यात कमी अधिक स्वरूपात आवक झाली होती. नंतर ती रोडावली. सध्या दरांवर दबाव असल्याने शेतकरी तूर आणत नसतील, असा अंदाजही बाजारातील जाणकार व्यक्त करीत आहेत. कारण जेव्हा शासकीय खरेदीची नोंदणी सुरू होती, तेव्हा बाजारातील दर हमीभावाऐवढे होते. शेतकऱ्यांनी नोंदणी टाळली. जळगाव येथे तर फक्त आठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. खरेदी केंद्रातून तूर आणण्याचे संदेश पाठवूनही त्यांनी ती विक्रीसाठी आणली नाही, असा दावा करण्यात आला.

जळगाव, अमळनेर, पाचोरा भागांतील बाजारात  तुरीला प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपयांपर्यंतचे दर आहेत, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com