पुणे जिल्ह्यात रब्बी पीक कर्जवाटप सुरू

पुणे जिल्ह्यात रब्बी पीक कर्जवाटप सुरू
पुणे जिल्ह्यात रब्बी पीक कर्जवाटप सुरू

पुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामासाठी एकूण ७२७ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडाअखेरीस ३९० शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी ७२ लाख रुपयांइतके पीक कर्जवाटप पूर्ण झालेले आहे.

रब्बी हंगामास सुरवात झालेली असून, सुरवातीच्या टप्प्यात कर्ज उचलीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. यंदाही पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गाव पातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आंबेगाव, बारामती, भौर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

आत्तापर्यंत दौंड तालुक्यातील १८६ शेतकऱ्यांना दोन कोटी ८८ लाख २३ हजार रुपयांचे, तर इंदापुरातील ११६ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख ९४ हजार रुपये, बारामतीतील ५१ शेतकऱ्यांना ३६ लाख ९९ हजार रुपये, पुरंदर तालुक्यातील ३७ शेतकऱ्यांना २४ लाख ८६ हजार रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे.

तालुकानिहाय पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
तालुका उद्दिष्ट
आंबेगाव ५९ कोटी १९ लाख ३० हजार रुपये,
बारामती ७८ कोटी २१ लाख ३४ हजार
भोर ३२  कोटी ४७ लाख ८६ हजार
दौंड ११० कोटी ९७ लाख ७१ हजार
हवेली २३ कोटी ७९ लाख ५७ हजार
इंदापूर १०३ कोटी ३४ लाख ७० हजार
जुन्नर ७३ कोटी १९ लाख ९० हजार
खेड ७१ कोटी ५४ लाख ६३ हजार 
मावळ १७ कोटी १२ लाख २५ हजार 
मुळशी १७ कोटी ७५ हजार
पुरंदर ५३ कोटी ७७ लाख ७३ हजार 
शिरूर ७५ कोटी ८० लाख ८६ हजार 
वेल्हा ११ कोटी ४३ लाख १५ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com