रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी

हरभरा
हरभरा
अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात केवळ पाच लाख ३९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी झाली. विभागात यवतमाळ वगळता एकाही जिल्ह्याला सरासरी लागवड क्षेत्रापर्यंतही पोचता आले नाही. 
 
या रब्बी हंगामात लागवड केलेल्या काही पिकांची काढणी सुरू झाली आहे. हंगामाचा आढावा घेतला असता अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरवर गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह रब्बी पिकांची पेरणी झाली.
 
वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात सरासरी एक लाख चार हजार २०० हेक्टरच्या तुलनेत ७४ हजार ४०० हेक्टरवर, तर वाशीम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६० हजार हेक्टरवर पेरणी झाली. अमरावती जिल्ह्यात एक लाख ४४ हजार ९०० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी एक लाख ३७ हजार ४०० हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ७८ हजार क्षेत्राच्या तुलनेत एक लाख चार हजार हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे. अकोला, अमरावती, वाशीम या तीन जिल्ह्यांना सरासरी लागवड क्षेत्राच्या जवळपासही पोचता आलेले नाही.
 
अमरावती विभागात या रब्बी हंगामात एकूण पाच लाख ३९ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा पाऊस कमी तसेच अनियमित झाल्याने सुरवातीला खरिपाला फटका बसला. त्यानंतर रब्बी हंगामसुद्धा परतीच्या दमदार पावसाअभावी होरपळला. प्रामुख्याने अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांना अधिक झळ पोचली.
 
अकोला जिल्ह्यात सुमारे ३० हजार, वाशीममध्ये ३२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरण्या होऊच शकलेल्या नाहीत. 
या रब्बीत पीक लागवडीचा आढावा घेतला असता हरभऱ्याने बाजी मारली. सवर्च जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र अधिक होते. विभागात सरासरी तीन लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. त्यातुलनेत चार लाख २३ हजार ७०० हेक्टरवर हरभरा पेरला गेला.
 
दुसरीकडे एक लाख ८० हजार हेक्टरपैकी ९५ हजार ५०० हेक्टरवर गहू पेरण्यात आला. पाण्याच्या उपलब्धतेअभावी गव्हाच्या लागवड क्षेत्रात घट आल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com