मराठवाड्यात रब्बीची ४ टक्के क्षेत्रावर पेरणी

परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी सुरु
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी सुरु

औरंगाबाद : यंदा सर्व आशा रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४.२२ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागांतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यांतील ७.२८ तर लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील २.४९ टक्‍के क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ४४० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ७५ हजार ९९२ हेक्‍टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ५२ हजार ५५ हेक्‍टर आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार २२८, जालना जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ६०० तर बीड जिल्ह्यातील ३ लाख १० हजार २२७ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

प्रत्यक्षात औरंगाबाद जिल्ह्यात ९९०९ हेक्‍टरवर, बीड जिल्ह्यात ३७ हजार ५३५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ ३३६ हेक्‍टरवर पेरणी झाली असून उस्मानाबाद जिल्ह्यात २६ हजार २५ तर हिंगोली जिल्ह्यात २१८७ हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मराठवाड्यात यंदा रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ९० हजार १२४ हेक्‍टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ५७ हजार १९ हेक्‍टरवर अर्थात केवळ ६.४१ टक्‍के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ४२ हजार १५२ तर लातूर, उस्मानाबाद,परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांतील १४ हजार ८६७ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा मराठवाड्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २६ हजार २५२ हेक्‍टर प्रस्तावित आहे. तुलनेत १५ हजार ४४५ हेक्‍टरवर अर्थात केवळ ४.८६ टक्‍के क्षेत्रावरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ४९७१ तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील १० हजार ४७४ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com