वऱ्हाडातील रब्बी हंगाम लक्ष्यांकाच्या आतच

रब्बी हंगाम पेरणी स्थिती
रब्बी हंगाम पेरणी स्थिती
अकोला ः विविध कारणांनी रखडलेला रब्बी हंगाम अखेर लक्ष्यांकाच्या अातच थांबल्याचे चित्र अाहे. वऱ्हाडातील तीनपैकी एकाही जिल्हयात या रब्बीत १०० टक्के क्षेत्र लागवडी खाली येऊ शकलेले नाही. 
 
अकोला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघी ४७.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. यापाठोपाठ वाशीममध्ये ५१.६ अाणि बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८८.७ टक्के पेरणी झाली आहे. खरिपात पिकांनी पाठ फिरवल्याने रब्बीत लागवड वाढेल असा अंदाज होता. त्यातच अाॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसानेही अपेक्षा वाढविल्या. मात्र शेतकऱ्यांनी रब्बी लागवडीकडे पाठ फिरवल्याचे अाता स्पष्ट होत अाहे.  
 
अकोला जिल्ह्यात सरासरी एक लाख २५२० हेक्टरच्या तुलनेत अवघी ४८ हजार ७४७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यातही सर्वाधिक ४६ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र हे हरभऱ्याचे अाहे. त्यानंतर गव्हाची लागवड १७७३ हेक्टरवर झाली. वाशीम जिल्हयातही काहीशी अशीच परिस्थिती अाहे. वाशीममध्ये हरभऱ्याची ३७ हजार १११ तर गव्हाची ६१३० हेक्टरवर पेरणी झाली. या जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र ८५ हजार ३२० हेक्टर असताना ४३ हजार ७५१ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या अवघी ५१.३ टक्के ही पेरणी अाहे. 
 
वऱ्हाडातील अकोला, वाशीमच्या तुलनेत अाकाराने मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात एक लाख १९ हजार १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तरीही सरासरी क्षेत्राच्या ८८.७ टक्केच क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली अाहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरण्यात अाला. १५,५०० हेक्टरवर गहू तर ९४१२ हेक्टरवर ज्वारी लागवड झाली अाहे. तीन हजार हेक्टरपर्यंत मक्याचीसुद्धा शेतकऱ्यांनी पेरणी केली.  
 
यावर्षी रब्बीच्या क्षेत्र घटीला कमी पावसासोबतच पेरणीसाठी पैशांची तजवीज होऊ न शकणे हेही एक मोठे कारण सांगितले जात अाहे. खरिपातील एकाही पिकापासून नफा तर दूरच लागवड खर्चाचीही भरपाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत खाली ठेवले पण रब्बी पेरणी करण्याची जोखीम घेतली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com