बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा : या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे २९ टक्के पाऊस कमी झालेला असल्याने त्याचा विपरीत परिणाम अातापासून व्हायला सुरवात झाली अाहे. रब्बी हंगामात पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता अाहे. जिल्हा प्रशासनाने सुमारे एक लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले असले, तरी प्रत्यक्षात किती पेरणी होईल, याबाबत निश्चित सांगणे कठीण असल्याचे अधिकारी सांगतात.

बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन असते. खरिपात प्रामुख्याने निम्म्याहून अधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली असते. सोयाबीनची काढणी करून शेतकरी रब्बी पिके घेतात. यामुळे साधारणतः दोन लाख हेक्टरपर्यंत रब्बीची पेरणी होत असते. यंदाची परिस्थिती ही पोषक नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी ६६७ मिमी असताना हंगामात केवळ ४६५ मिमी पाऊस झाला. यातही खामगाव (३१७ मिली), नांदुरा (३६२ मिली) येथे तुरळक पाऊस झाला अाहे.

अनियमित पावसामुळे थेट रब्बीच्या लागवडीला फटका बसत अाहे. प्रकल्पांमध्ये २० टक्केही पाणीसाठा नाही. विहिरींची पातळीही खोल गेली असून, अातापासूनच विहिरींवरील सिंचन अडचणीत अालेले अाहे. अशा स्थितीत पिकांना पाणी द्यायचे कसे हा पेच अाहे. प्रशासनाने सर्व शक्यता गृहीत धरत एक लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. यात प्रामुख्याने हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहू शकते. रब्बी ज्वारीचे १४ हजार, गव्हाचे ३२ हजार, मकाचे साडेनऊ हजार व उर्वरित क्षेत्र इतर पिकांचे असेल.

मुळात हे क्षेत्र परतीच्या पावसावर तसेच जमिनीत राहणाऱ्या अार्द्रतेवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून अाहे. कारण या जिल्ह्यात मागील महिन्यात झालेला पाऊससुद्धा पुरेसा प्रमाणात नाही. अाता पाऊस परतत असल्याने त्याने हजेरी लावली तरच रब्बीचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जात अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com