मराठवाड्यात ज्वारी, हरभऱ्याची काढणी सुरू

मराठवाड्यात ज्वारी, हरभऱ्याची काढणी सुरू
मराठवाड्यात ज्वारी, हरभऱ्याची काढणी सुरू

औरंगाबाद : खरिपात पीक हातचे गेलेल्या मराठवाड्यातील रब्बीची काही पिके पक्‍वतेच्या, तर काही पिके काढणीच्या अवस्थेला आली आहेत. लवकर पेरलेल्या हरभऱ्याची काढणी सुरू असून, रब्बी ज्वारी बहुतांश भागात पक्‍वतेच्या अवस्थेत तर काही भागांत ज्वारीची काढणी सुरू झाली आहे.  यंदा मराठवाड्यात १८ लाख ६ हजार ९८० हेक्‍टरवर रब्बी क्षेत्र गृहीत होते. या तुलनेत यंदा १८ लाख ९८ हजार ३८९ हेक्‍टरवर (१०४ टक्‍के) पेरणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. हरभऱ्याची सर्वसाधारण ४ लाख २६ हजार २५२ हेक्‍टरच्या तुलनेत ९ लाख ७ हजार ८० हेक्‍टरवर म्हणजे २१२ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. या क्षेत्रापैकी रब्बी ज्वारीबरोबर पेरणी झालेल्या हरभऱ्याची काढणी सुरू झाली आहे. तर त्यानंतर पेरणी झालेला हरभरा पक्‍वतेच्या वा काढणीच्या अवस्थेत जाऊन पोचला आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८२ हजार ४७७ हेक्‍टर गृहीत होते. त्या तुलनेत यंदा ९४ टक्‍के अर्थात २ लाख ६५ हजार ९५६ हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. काही भागात गव्हाचे पीक वाढीच्या, काही भागांत पक्‍वतेच्या, तर काही भागांत काढणीच्या अवस्थेत पोचले आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ९६ हजार ४६९ हेक्‍टर गृहीत होते. त्या तुलनेत ७१ टक्‍के क्षेत्रावर अर्थात ६ लाख ३६ हजार ६०० हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. पक्‍वतेच्या व काढणीच्या अवस्थेत पोचलेल्या या ज्वारीच्या क्षेत्रापैकी काही भागांतील ज्वारी पाणी न मिळाल्याने बाटूक झाली, तर काही भागांतील पीक पक्‍वतेच्या, ते काढण्याच्या अवस्थेत येऊन पोचले आहे. पंधरवड्यात ज्वारी काढणीचा हंगाम जोमात राहण्याची चिन्हे आहेत. जालना जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात ज्वारीवर चिकट्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४२ हजार ४४७ हेक्‍टवर पेरणी झालेल्या रब्बी मक्याचे पीक कणसे भरण्याच्या ते पक्‍वतेच्या अवस्थेत आहे. मराठवाड्यात १ लाख ६ हजार १६० हेक्‍टरवर करडईची पेरणी होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत केवळ २६ टक्‍के म्हणजे २८ हजार २३२ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली. हे करडईचे पीक दाणे भरण्याच्या ते पक्‍वतेच्या अवस्थेत आहे.  तूर काढणी अंतिम टप्प्यात; कापसाच्या वेचण्या पूर्ण मराठवाड्यात जवळपास साडेचार लाख हेक्‍टरवर तुरीचे क्षेत्र विस्तारले आहे. या क्षेत्रावरील तुरीची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यात कपाशीचे क्षेत्र जवळपास सतरा लाख हेक्‍टवर विस्तारले होते. यंदा बोंड अळीचा हल्लाबोल झाल्याने कपाशीचे पीक नेस्तनाबूत झाल्यात जमा आहे. जवळपास  मराठवाड्यातील कापसाच्या वेचण्याही पूर्ण झाल्या आहेत. यंदा डिसेंबर, जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक संपविण्याला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com