रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना

रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना

राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. मात्र सदर योजनेतील अनेक त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केलेली आहे. गेल्या काही वर्षांतील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरली आहे. नैसर्गिक असमतोलामुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमायोजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे.

रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी : योजनेचे उद्दिष्टे ः 

  • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
  • पिकांचा समावेश ः 

    हंगाम  तृणधान्य व कडधान्य पिके  गळीत धान्य पिके  नगदी पिके
    रब्बी हंगाम (एकूण ८ पिके) उन्हाळी भात, गहू (बागायती, जिरायती), रब्बी ज्वारी (बागायती जिरायती), हरभरा उन्हाळी भुईमूग, करडई, सूर्यफूल रब्बी कांदा

    योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ः 

  • अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
  • पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे. 
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. बिगर कर्जदारांस संबंधित बँकेमध्ये विमा प्रस्तावदाखल करून, विमा हप्ता भरून योजनेत सहभागी होता येईल.
  • योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत ः

  • रब्बी ज्वारी पिकासाठी सोलापूर जिल्ह्यास दि. ३० नोव्हेंबर २०१७ ही अंतिम मुदत आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी १ जानेवारी २०१८ ही अंतिम मुदत आहे.
  • गहू (बागायत व जिरायत), हरभरा, करडई, सूर्यफूल, रब्बी कांदा या पिकांसाठी १ जानेवारी २०१८ ही अंतिम मुदत आहे.
  • उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी  ३१ मार्च २०१८ ही अंतिम मुदत आहे.
  • या योजनेत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के आहे.
  • पीकनिहाय प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता ः

    पीक   विमा संरक्षित रक्कम (रु./ हे.)  विमा हप्ता शेकडा प्रमाण शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता (रु./हे)
    गहू (बा.)  ३३,०००  १.५  ४९५
    गहू (जि.)  ३०,०००  १.५  ४५०
    ज्वारी (बा.)  २६,०००  १.५  ३९०
    ज्वारी (जि.)  २४,०००  १.५  ३६०
    हरभरा  २४,०००  १.५  ३६०
    उ. भुईमूग  ३६,०००  १.५  ५४०
    उ. भात  ५१,०००  १.५ ७६५
    कांदा  ६०,००० ५  ३,०००
    करडई  २२,०००  १.५  ३३०
    सुर्यफूल  २२,०००  १.५  ३३०

    टीप ः शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ताबाबत वरील माहिती ही प्रती हेक्टरी अधिकतम रक्कम असून, जिल्हानिहाय ती वेगवेगळी असली तरी शेतकऱ्यांसाठी वरील दर्शविलेल्या रकमेपेक्षा ती अधिक राहणार नाही. उदा ः कोल्हापूर जिल्ह्यात गहू बागायतीसाठी विमा हप्ता ३३० रुपये प्रति हेक्टरी, ज्वारी बागायत २४०  रुपये प्रति हेक्टरी, हरभरा २४० रुपये प्रति हेक्टरी, उन्हाळी भातासाठी  ३६० रुपये प्रति हेक्टरी असा आहे. जळगाव जिह्यात रब्बी कांदा पिकासाठी १,३०८ रुपये प्रति हेक्टरी आहे.

    विमा नुकसान भरपाईची निश्चिती ः   पिकाचे गत सात वर्षांतील नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्षे वगळून येणाऱ्या सरासरी उत्पादनास जोखीम स्तराने गुणून त्या पिकाचे उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते. त्यानंतर चालू हंगामात महसूल मंडल/तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.                         उंबरठा उत्पादन -                         प्रत्यक्ष आलेले                         सरासरी उत्पादन नुकसान भरपाई रु. =----------- x विमा संरक्षित रक्कम रु.                         उंबरठा उत्पादन

    योजनेतील महत्त्वाच्या तरतुदी ः 

  • पीक काढणीनंतर चक्री वादळ, अवेळी पावसामुळे सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यांस वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई देय आहे.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच शेतात पुराचे पाणी शिरून झालेले पिकाचे नुकसान, भूस्खलन, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देय आहे.
  • नुकसान भरपाई मिळण्यासाठी ः

  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे.
  • संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यांस वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतीम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.  
  • विमा योजनेत कोणताही शेतकरी, कोणत्याही पिकासाठी, कोणत्याही क्षेत्रासाठी सहभाग घेऊ शकतो काय?      राज्य शासनामार्फत दि. १७/११/२०१७ च्या शासन निर्णयाअन्वये अधिसूचित केलेल्या ८ पिकांसाठीच विमा योजनेत सहभागी होता येते आणि पीकनिहाय अधिसूचित महसूल मंडळ/तालुक्यातील शेतकरी हे त्या अधिसूचित पिकांसाठी विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात.

    शेतकऱ्याने विमा योजनेत सहभागी होण्याकरिता ः 

  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास विमा योजनेत सहभाग बंधनकारक आहे. 
  • इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा व पीक पेरणीचा दाखला, आधार कार्ड,बँक खाते तपशील घेऊन प्राधिकृत बँकेत हप्ता भरून सहभाग घ्यावा. 
  • हप्ता भरलेली पोच पावती त्याने जपून ठेवावी.
  • आपले सरकार (डिजिटल सेवा केंद्र) मार्फत अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हानिहाय प्राधिकृत विमा कंपन्या
  • विमा कंपनी समाविष्ट जिल्हे
    ओरिएंटल इन्शुरस कंपनी लिमिटेड नगर, औरंगाबाद, बुलढाणा, सातारा, अमरावती, जळगाव
    नॅशनल इन्शुरस कंपनी लिमिटेड  सोलापूर, लातूर, पुणे, भंडारा, चंद्रपूर, परभणी, अकोला, सांगली, हिंगोली, नागपूर, वर्धा, बीड, वाशीम, रायगड, रत्नागिरी, ठाणे, जालना, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर, गोंदिया, पालघर

    संपर्क : 

  • www.krishi.maharashtra.gov.in वर माहिती उपलब्ध आहे. 
  • अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी / स्थानिक मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
  •  ः विनयकुमार आवटे - ९४०४९६३८७० (अधीक्षक कृषी अधिकारी (मग्रारोहयो) पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com