परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा

सारोळा,जि.परभणी ः सारोळा (ता. पाथरी) शिवारात नुकतेच उगवलेले ज्वारीचे पीक.
सारोळा,जि.परभणी ः सारोळा (ता. पाथरी) शिवारात नुकतेच उगवलेले ज्वारीचे पीक.

परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये परतीचा पावासामुळे रब्बीच्या पेरणीचा खोळंबा झाला आहे. मुसळधार पावसामुळे पेरणी केलेल्या ज्वारी, करडई पिकांची उगवण व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. काही भागात अजूनही जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यामुळे पेरणी सुरू करता आलेली नाही. तर अतिवृष्टी झालेल्या भागात वाफसा नसल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात नांदेड जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख ८८ हजार १३२ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख २७ हजार हेक्टर अशी एकूण ६ लाख ४० हजार १३२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. ज्वारी, करडई, हरभरा, गहू ही प्रमुख पिके घेतली जातात.

साधारणतः सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात ज्वारी, करडई, हरभरा आदी पिकांची पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात परभणी, हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत खरिपात नापेर राहिलेल्या जमिनीवर, मूग, उडदाच्या काढणीनंतर मोकळ्या झालेल्या जमिनीवर तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीनंतर जमिनीतील ओलावा उडून जाऊ नये यासाठी पेरणीपूर्व मशागत न करता ज्वारी, करडई, हरभरा आदी पिकांची पेरणी केली.

परंतु गेल्या आठवड्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झाल्यामुळे पेरणी थांबवावी लागली. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ज्वारी आदी पिकांच्या उगवणीसाठी पोषक ठरला आहे. परंतु मुसळधार पाऊस झालेल्या भागात पेरणी केलेल्या जमिनीवरून पाणी वाहिले. त्यामुळे मातीसोबत बियाणे वाहून गेले. गाळाचा थर जमा झाल्यामुळे ज्वारीची उगवण झालेली नाही. पाणी साचून राहिल्यामुळे मर लागून ज्वारीचे पीक विरळ झाले आहे.

पाणी साचून राहिल्यामुळे नुकत्याच उगवू लागलेलया करडईच्या पिकास मर लागली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना ज्वारी, करडईची दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुसरीकडे यंदा पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडलेल्या हदगाव (ता. पाथरी) मंडळातील अनेक गावाशिवारात परतीच्या पावसाचे प्रमाणदेखील कमीच आहे.

पेरणीसाठी अद्यापही पुरेसा ओलावा उपलब्ध झालेला नाही. जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणीदेखील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे पेरणीसाठी जमीन ओलविता येत नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अनेक गावशिवारांत रब्बीची पेरणी झाली आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्यामुळे रब्बीचे पेरणी अहवाल उपलब्ध होत नाहीत. शनिवार (ता.१४) पर्यंत हिंगोली जिल्ह्यात ज्वारी ३३६ हेक्टर, हरभरा ५२७ हेक्टर, करडई ८ हेक्टर एवढी पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सहा एकर ज्वारी पेरणी केली होती. परंतु मुसळधार पावसामुळे त्यापैकी ७५ टक्के क्षेत्रावरील ज्वारी उगवण झाली नाही. दुबार पेरणी करावी लागणार आहे. नामदेव कोक्कर, शेतकरी, मानवत, जि. परभणी

यंदा आमच्या भागात अत्यंत कमी पाऊस झाला. खरीप हंगाम वाया गेला. परतीचा पाऊसही कमीच आहे. जायकवाडीच्या कालव्याचे पाणीदेखील जमीन ओलिण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे अजून पेरणी सुरू केली नाही. रामचंद्र चवरे, शेतकरी, केदार वस्ती (वरखेड), ता. पाथरी, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com