रब्बी हंगामात सात हजार पीककापणी प्रयोग

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे (प्रतिनिधी) ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पीककापणी प्रयोग घेण्यात येत आहेत. चालू वर्षी रब्बी हंगामातील पिकांचे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २८६ महसूल मंडळांत सात हजार ७८ कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी दिली.

पिकांच्या दर हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळ स्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्टरी उत्पन्नाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीककापणी प्रयोग घेण्यात येतात.

त्यासाठी कृषी विभागातील सर्व पातळ्यांवरील अधिकारी पिकांच्या उत्पादनाचा रॅंडम पद्धतीने अंदाज काढतात. या वेळी महसूल विभागाचे तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आदी उपस्थित असतात. त्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

पीककापणी प्रयोगामध्ये जिरायती व बागायती ज्वारी, जिरायती व बागायती गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल व कांदा आदी पिकांचे पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत. त्याची माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व नॅशनल इन्शुरन्स कंपनीला लवकरच सादर केली जाणार आहे. यंदा विभागातील नगर जिल्ह्यात एकूण दोन हजार ११८ पीककापणी प्रयोग घेतले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात दोन हजार २४९, सोलापूर जिल्ह्यात दोन हजार ७११ पीककापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

पीकनिहाय घेण्यात येणाऱ्या पीक प्रयोगाची संख्या

पीक  संख्या
ज्वारी बागायती      ६२४
ज्वारी जिरायती    ८२८
गहू बागायती   ३४०
गहू जिरायती    ८४
मका   ४४
हरभरा       २६८
करडई      ३१२
सूर्यफूल    १३०
कांदा    ८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com