औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी पेरणी संथ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात यंदाच्या रब्बी पेरणीची सुरवात संथ गतीने झाली आहे. तीनही जिल्ह्यांतील सरासरी ६ लाख ५२ हजार ५५ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३७ हजार ७५१ हेक्‍टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. काही भागांत जमिनीत ओलच नसणे तर काही भागांत अतिपावसामुळे रब्बीच्या पेरणीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८९ हजार २२८ हेक्‍टर आहे. त्यापैकी ६ हजार ६५९ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यापैकी खरीप हातचा गेलेल्या पैठण तालुक्‍यात झालेल्या सर्वाधिक ५६८८ हेक्‍टरवरील रब्बी पेरणीचा समावेश आहे.

खुल्ताबाद, कन्नड, वैजापूर, औरंगाबाद तालुक्‍यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प पेरणी झाली असून सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री व गंगापूर तालुक्‍यात मात्र रब्बी पेरणीला सुरवातच झाली नाही. जालना जिल्ह्यात यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५२ हजार ६०० गृहित धरण्यात आले आहे.

प्रत्यक्षात जालना जिल्ह्यातील एकाही तालुक्‍यात रब्बी पेरणीचा अजूनही शुभारंभ झाला नाही. बीड जिल्ह्यात रब्बीचे ३ लाख १० हजार २२७ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात त्यापैकी ३१ हजार ९२ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दहा टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे.

त्यामध्ये सर्वाधिक २७ हजार ७४५ हेक्‍टरवर पेरणी झालेल्या आष्टी तालुक्‍यातील रब्बी क्षेत्राचा समावेश आहे. बीड तालुक्‍यात सर्वसाधारण ५५६६० हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १ हजार ९१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. माजलगाव तालुक्‍यात ३१६७३ हेक्‍टरवरील रब्बी क्षेत्राच्या तुलनेत २२५६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

ज्वारीचा पेरा सर्वाधिक औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत आजवर ३४ हजार ९१० हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २९ हजार ४७२ हेक्‍टरवरील तर औरंगाबाद जिल्ह्यातील ५ हजार ४३८ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. दुसरीकडे मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १२ हजार ४६३ हेक्‍टर असताना केवळ १२ हेक्‍टरवर मक्याची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

२७५० हेक्‍टरवर हरभरा औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार ४२८ हेक्‍टर आहे. त्यापैकी केवळ २७५० हेक्‍टरवरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हरभऱ्याच्या सर्वसाधारण ४३ हजार २१७ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत ११८४ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात ५० हजार ४१० हेक्‍टर हरभऱ्याचे क्षेत्र असून त्यापैकी केवळ १५६६ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात हरभरा पेरणीची अजून सुरवातच झाली नसल्याचे आकडे सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com