मराठवाड्यातील ३९६ मंडळांत पाऊस

मराठवाड्यातील ३९६ मंडळांत पाऊस
मराठवाड्यातील ३९६ मंडळांत पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास ३९६ मंडळांत मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने मध्यम ते दमदार व सहा ठिकाणी जोरदार हजेरी लावली. परभणी व नांदेड जिल्ह्यांतील सहा मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जवळपास सर्वदूर पडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सोमवारी सकाळी सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपिने सायंकाळनंतर बहुतांश मंडळांत दमदार हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी तब्बल ५० मंडळांत पावसाची हजेरी लागली. सरासरी १२.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, गंगापूर, खुल्ताबाद तालुक्‍यात अनुक्रमे पावसाचा जोर थोडा अधिक होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४२ मंडळांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील बदनापूर तालुक्‍यातील मंडळांमध्ये १५ ते ३२ मिलिमीटर, जालना तालुक्‍यातील मंडळांत ६ ते १९ मिलिमीटर, घनसावंगी तालुक्‍यातील मंडळात ८ ते ३८ मिलिमीटर, अंबड तालुक्‍यातील मंडळांत ५ ते ३२ मिलिमीटर, मंठा तालुक्‍यातील मंडळात ४ ते १६ मिलिमीटर, परतूर तालुक्‍यातील मंडळांमध्ये १३ ते ४२ मिलिमीटर, भोकरदन तालुक्‍यातील केवळ दोन मंडळांत पावसाने दमदार हजेरी लावली. जाफ्रबाद तालुक्‍याकडे पावसाने पुन्हा एकदा पाठच फिरविली. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३७ मंडळात हलका, मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पूर्णा मंडळांत ९८ मिलिमीटर, पाथरी मंडळात ७९ मिलिमीटर तर मानवत मंडळात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ३० मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

नांदेड तालुक्‍यातील तुप्पा मंडळांत ७० मिलिमीटर, वसरनी मंडळात ८३ मिलिमीटर तर लिंबगाव मंडळांत ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड तालुक्‍यात सरासरी ५८.१३ मिलिमीटर पाऊस नोंदल्या गेला. उमरी तालुक्‍यात सरासरी २८ मिलिमीटर तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, माहूर, हदगाव, हिमायतनगर, बिलोली धर्माबाद, नायगाव, मुखेड या तालुक्‍यांमध्ये सरासरी ११.७५ ते २३.६७ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या नागापूर मंडळाच अपवाद वगळता ६३ पैकी ६२ मंडळांत तुरळक, हलकी ते मध्यम पावसाची हजेरी लागली. लातूर जिल्ह्यात ५३ मंडळात तुरळक हलका ते मध्यम पाऊस नोंदल्या गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११.६३ मिलिमीटर राहिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ४२ मंडळांत पावसाची नोंद झाली. मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाउस झालेल्या या जिल्ह्यात सरासरी १५.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २२ तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक

मराठवाड्यातील एकूण ७६ तालुक्‍यांपैकी सोमवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत २२ तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्‍यांमध्ये सरासरी २० ते ५८ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद, हिंगोली व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, परभणी जिल्ह्यातील सहा, नांदेड जिल्ह्यातील चार तर बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्‍याचा समावेश आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडळ परभणी जिल्हा पूर्णा      ९८ मिलिमीटर पाथरी      ७९ मिलिमीटर मानवत       ६८ मिलिमीटर नांदेड जिल्हा तुप्पा     ७० मिलिमीटर वसरनी     ८३ मिलिमीटर लिंबगाव     ८० मिलिमीटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com