अकोला, वाशीममध्ये पाऊस कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः वऱ्हाडात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अकोला, वाशीम जिल्ह्यांत बुधवारीदेखील पावसाची हजेरी कायम होती. बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे.  गुरुवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात सरासरी ३३.८, वाशीममध्ये २२.४ तर बुलडाणा जिल्ह्यात सर्वात कमी ७.८ मिमी पावसाची नोंद झाली.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्याने मूर्तिजापूर तालुक्‍याला मोठा तडाखा बसला आहे. उमा नदीसह बऱ्याच छोट्या नदी-नाल्यांना पूर आले. आठ ते दहा गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे जनजीवन सुरळीत होऊ शकले नव्हते. पुराचे पाणी उतरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात यायला सुरवात झाली. बुधवारी आलेल्या पुराच्या पाण्याने मूर्तिजापूर तालुक्‍यातील शेकडो एकर जमीन खरडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भागात पेरणी झाली होती. पिकेही खरडून गेली आहेत. प्रशासनाकडून याची अधिकृत माहिती घेतली जात आहे. 

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मूर्तिजापूरमध्ये सर्वाधिक ४४.८ मिमी पाऊस नोंदविला गेला. याशिवाय अकोटमध्ये ३९.९ मिमी पाऊस झाला. सर्वांत कमी १६.२ मिमी पातूरमध्ये नोंदला आहे. वाशीम जिल्ह्यात रिसोड वगळता उर्वरित पाच तालुक्‍यांमध्ये चांगला पाऊस झाला. प्रामुख्याने मानोरा, मंगरुळपीर या तालुक्‍यात जोर अधिक होता.

अकोला-वाशीम जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत असताना शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात मात्र तितकासा जोर नाही. देऊळगावराजा तालुका तर अनेक दिवसांपासून कोरडा आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात तालुक्‍यात पाऊस पडलेला नाही. प्रामुख्याने घाटावरील बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आदी तालुक्‍यांमध्ये पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला. त्या तुलनेत घाटाखालील संग्रामपूर येथे २०.८, जळगाव जामोद येथे २३.२, खामगाव येथे १०, शेगाव येथे ८.४, नांदुरा येथे ९.८, मलकापूर येथे ८.४ पावसाची नोंद झाली.

मागील चार दिवसांपासून अकोला, वाशीममध्ये बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने याचा फायदा धरण प्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यासाठी होऊ लागला आहे. गेल्या महिन्यात एक टक्‍क्‍यापर्यंत पाणीसाठा असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा आता १३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे.

वऱ्हाडात गुरुवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) :  अकोला जिल्हा (मिमी) ः अकोला ३१.६, बार्शीटाकळी ३३.५, अकोट ३९.९, तेल्हारा ३९.७, बाळापूर ३०.९, पातूर १६.२, मूर्तिजापूर ४४.८.  वाशीम जिल्हा ः वाशीम १८.८, मालेगाव १४.८, रिसोड ४.१, मंगरुळपीर ३०, मानोरा ३८.९, कारंजा २७.६.  बुलडाणा जिल्हा ः बुलडाणा ३.१, चिखली ४.२, मेहकर ४.७, लोणार १.३, सिंदखेडराजा १.७, मलकापूर ८.४, मोताळा ५.६, खामगाव १०, शेगाव ८.४, जळगाव जामोद २३.२, संग्रामपूर २०.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com