पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची हजेरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सुमारे ६६ टीएमसी (३० टक्के) पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात सुरू असलेल्या पावसाने तळाशी गेलेल्या धरणांची पाणीपातळी वाढून बहुतांशी धरणांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरू असतानाच पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी (ता. १४) जिल्ह्यात पहाटे अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. अधूनमधून एखाद - दुसरी सर येत होती. पश्‍चिम पट्ट्यात मात्र पावसाच्या सरीमागून सरी बरसत होत्या. पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पावसाची उघडीप कायम असून, जोरदार पावसाची आवश्‍यकता अाहे.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा विचार करता कलमोडी धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, पानशेत, खडकवासला, गुजवणी धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक, तर बहुतांशी धरणांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. कलमोडी आणि वडीवळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढतच आहे.

शनिवारी (ता. १४) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : माणिकडोह १५, येडगाव १०, वडज १०, डिंभे २२, वडीवळे ३०, आंद्रा २३, पवना ८५, कासारसाई १३, मुळशी ५४, टेमघर ४७, वरसगाव ४३, पानशेत ३५, गुंजवणी ३१, निरादेवघर ५५, भाटघर २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com