कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊस

कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊस
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता.२२) सायंकाळी एक ते दोन तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागात समाधान आहे. गगनबावडा, भुदरगड, कागल तालुक्‍यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.

जिल्ह्यातील धुळवाफ पेरण्यांना संपल्या आहेत. सध्या खरिपाच्या पेरण्यांच्या धांदलीत शेतकरी आहेत. कधी ढगाळ हवामान, तर कधी पाऊस असे वातावरण जिलंह्यात असल्याने पेरण्या कराव्यात की नाही, या विवंचनेत शेतकरी होता. पण शनिवारच्या पावसामुळे काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला. सध्या आजरा, चंदगड तालुक्‍यात भुईमुगाची पेरणी अंतिम टप्प्यात येत आहे.

चंदगड तालुक्‍यात पेरणीसाठी नांगरणी, कुळवणीची कामे जोरात सुरू आहेत. विशेषतः भुईमूग पेरणीसाठी हे वातावरण अनुकूल असून पेरणी अंतिम टप्प्यात आहे. तालुक्‍यात भात व ऊस या मुख्य पिकासह नाचणी, मिरची, रताळी, भुईमूग व कडधान्य पिके घेतली जातात. तालुक्‍याच्या पूर्व भागात भाताची धुळवाफ पेरणी केली जाते, तर पश्‍चिम भागात तरवे टाकून मोठ्या पावसात रोपलावण केली जाते. पूर्व भागात धुळवाफ पेरणी केलेले भात पीक उगवून आले आहे.

उघडिपीमुळे कोळपणीची धांदल आहे. पश्‍चिम भागात तरवे टाकणीचे काम झाले आहे. बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यात मात्र जोराचा पाऊस नसल्याने अद्यापही पेरणीबाबत शेतकरी साशंकच आहेत.

भुदरगडमध्ये सर्वाधिक २७ मि.मी.

जिल्ह्यात रविवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता चोवीस तासात भुदरगड मध्ये सर्वाधिक २७ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ८.४२ टक्के पाऊस झाला. हातकणंगले ६.६३, शिरोळ २.७१, पन्हाळा १.२९, शाहूवाडी १.३३, राधानगरी ३.१७, गगनबावडा १६, करवीर ३.९१, कागल २१, गडहिंग्लज १०.७१, भुदरगड २७.६०, आजरा ३.२५ आणि चंदगडमध्ये ३.५० मि.मी. पाऊस झाला.अद्याप सर्वदूर पाऊस नसला तरी, हवामानात काहीसा गारवा निर्माण होत आहे.

पिकांना पाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे धरणे व नद्याच्या पाण्यावर येणारा ताण काहीसा कमी होइल, अशी शक्‍यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com