कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा कमी जोर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता.२०) दुपारी दोन वाजता कमी करण्यात आला आहे. सध्या या धरणातून २७ हजार १७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सूरू आहे. पश्‍चिमेकडील महाबळेश्र्वर, पाटण, जावली, सातारा, कराड तालुक्यात मात्र पाऊस सुरूच आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट जोर कमी होऊ लागल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवर करण्यात आले. या दरवाज्यातून २४ हजार ९१७ व पायथा वीजगृहातून २१०० असा एकुण २७ हजार १७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. कोयना धरणात १०१.०२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण भरण्यासाठी अवघ्या चार टीएमसी पाण्याची गरज आहे.

तसेच धोम, कण्हेर, बलकवडी व उरमोडी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये धोम धरणातून ४२३०, कण्हेर धरणातून ३९५५, बलकवडी धरणातून १२२३, उरमोडी धरणातून ४५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्र्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच पाटण, जावली, सातारा, कराड या तालुक्यांत अनके ठिकाणी अधूनमधून पावसाचा दमदार सरी कोसळत आहेत. कोरेगाव, वाई, खटाव, खंडाळा तालुक्यात तुरळक पाऊस सुरू आहे. माण व फलटण तालुक्यात पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे.  

जिल्ह्यातील पश्चिम भागात दमदार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणी सोडावे लागत आहे. मात्र, प्रामुख्याने माण व फलटण, तालुक्यातील अनेक गावे कोरडी आहेत. सर्वात कमी पाऊस माण तालुक्यात झाला असल्याने येथील पिके धोक्यात आली आहेत. या तालुक्यातील आठ गावे व ३८ वाड्यावस्त्यांवर सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्यातील पाऊस पडावा, यासाठी म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनच्या वतीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यास सुरवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)
धरण पाणीसाठा
कोयना  १०१.०२
धोम  १२.५६
कण्हेर ९.५७
उरमोडी ९.५२
तारळी ५.३८२
बलकवडी ३.८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com