धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

धुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात सोमवारी (ता.१९) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण होते. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, चाराही ओला झाल्याने तो काळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांबही उन्मळून पडले.

धुळे शहरासह तालुक्‍यातील मोराणे प्र. लळिंग, आनंदखेडे, वार-कुंडामे, उडाणे, गोताणे, चौगाव, कुसुंबा, मेहेरगाव, कावठी, निमडाळे, गोंदूर, कापडणे, सोनगीरसह परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. कुसुंबा व परिसरात दुपारी चारला व त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाचला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तब्बल अर्धा तास तो सुरू होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कपाशी, कांद्यासह चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसामुळे कुसुंबासह परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही कोसळले. यामुळे अंधार पसरला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. झाडे कोसळल्यामुळे नागपूर-सुरत महामार्गावरील कुसुंबा परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. नंतर ही वाहतूक बायपासने वळविण्यात आली.

धुळे तालुक्यातील उडाणे, गोताणे, चौगाव, आनंदखेडे परिसरातही सायंकाळी पाचला वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात कांद्याचे मोठे नुकसान झाले. उडाणे येथील गोठ्याचे छप्परही उडाले. शेतकऱ्यांची चारा झाकण्यासाठी धांदल उडाली.

रनाळे परिसरातही हजेरी

न्याहली : रनाळे (ता. नंदुरबार) परिसरातही सांयकाळी पाचला वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार तालुक्‍यातील पूर्व भागातील रनाळे, घोटाणे, आसाणे, कार्ली, न्याहली, खोक्राळे आदी परिसरात अचानक पावसाला सुरवात झाली. पावसासोबत वादळही होते. हा पाऊस सुमारे अर्धा तास सुरू होता. या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. वादळासह आलेल्या पावसामुळे कांदा, टरबूज, पपई व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com