पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची उघडीप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाचा जोर ओसरला असून, काही भागांत उघडीप दिली आहे. बुधवारी (ता.१८) सायंकाळी पश्‍चिम पट्ट्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या भागांतील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. बहुतांशी धरणे ५० टक्‍क्‍यांवर भरली आहेत. खडकवासला आणि कळमोडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून, पावसामुळे भात लागवडीलाही चांगलाच वेग आलेला आहे. पूर्वेकडील भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत भोळवडे येथे सर्वाधिक १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. निगुडघर येथे ५९.०, भोर येथे १६.०, नसरापूर येथे २०.०, किकवी येथे १५.०, आंबावडे येथे ३४.०, संगमनेर येथे १६.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुळशी तालुक्‍यातील मुठे येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पौड येथे २५.०, घोटावडे येथे ३२.०, मळे येथे ३७.०, पिरंगुट येथे २२.० मिमी पाऊस झाला. मावळ तालुक्‍यातील लोणावळा येथे ६८, वडगाव मावळ येथे ११.०,  काले येथे २९.०, कार्ला येथे ४२.० मिमी पावसाची नोंद झाली. तळेगाव, शिवणे येथे हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. वेल्हा तालुक्‍यातील वेल्हा येथे २६.०, पानशेत येथे २८.०, विंझर येथे २१.०, आंबावणे येथे २६.० मिमी पावसाची नोंद झाली.

जुन्नर तालुक्‍यात राजूर येथे ३५, आपताळे येथे २५; तर डिंगोरे येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली. जुन्नर, नारायणगाव, ओतूर येथे हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. हवेली तालुक्‍यातील पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली येथे हलक्‍या स्वरूपाच्या सरी बरसल्या. खेड तालुक्‍यातील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, पिंपळगाव, कडूस येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव, आंबेगाव, इंदापूरमधील निमगाव, पुरंदरमधील सासवड येथे हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान असून, पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com