साखरदर पाडण्यामागे कारखानदार, व्यापाऱ्यांचा हात ः राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

पंढरपूर, जि. सोलापूर ः देशात गरजेइतकेच साखर उत्पादन झाले आहे. तरीही साखरेचे भाव पडले आहेत. यामागे साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचा हात आहे. साखर खरेदी विक्री व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत कारखानदार आणि व्यापाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.  उपरी (ता. पंढरपूर) येथे शनिवारी (ता. १३) सायंकाळी खासदार शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या साखर खरेदी विक्रीच्या धोरणावर जोरदार टीका केली. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, या वर्षी उसाचे क्षेत्र मोजके आहे. त्यामुळे साखर उत्पादनदेखील कमीच होणार आहे. मागील हंगामातील शिल्लक साखर संपल्याने नव्याने उत्पादित झालेली साखर बाजारात आली आहे; मात्र कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून साखरेचे भाव पाडले आहेत. केंद्र सरकारने साखर साठा करण्यास बंदी घातली होती. बंदी उठवावी, यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर मध्यंतरी सरकारने स्टॉक लिमिटचे बंधन उठवल्यानंतर, साखरेचे भाव वाढण्याऐवजी लगेच पडले. यामागेसुद्धा साखर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांचे षड्‍यंत्र आहे. ‘‘गेल्या महिन्यामध्ये देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. ज्यांनी साखर विकत घेतली आणि ज्यांनी विकली त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मागील आठवड्यात अन्न व नागरीपुरवठा मंत्री, अर्थमंत्री आणि व्यापारमंत्र्यांशी भेट घेऊन केली आहे. चौकशीनंतर साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचा खरा हेतू समोर येईल; परंतु शेतकऱ्यांना फसवण्यासाठी कोणी साखरेचे भाव पाडत असतील, तर आम्ही त्यांच्या नरडीवर पाय देऊन आमच्या घामाचा दाम वसूल करू, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.  शेतीच्या घसरलेल्या विकास दराबद्दल विचारले असता खासदार शेट्टी म्हणाले, शेतीचा विकास दर घसरण्यास सरकारची धोरणे कारभूत आहेत. चुकीच्या धोरणांमुळे शेतीमधील गुंतवणूक कमी झाल्याने शेतीमालाला हमी मिळत भाव नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आयात शेतीमालावरील खर्चात वाढ झाली आहे. २८ हजार कोटींवरून १ लाख ४० लाख हजार कोटींपर्यंत गेली आहे. शेतमालाची निर्यात ४२ हजार डॉलरवरून ३२ हजार डॉलरवर आली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती विकास दर घसरल्याचे ही खासदार शेट्टी यांनी सांगितले. या वेळी रविकांत तुपकर, साहेबराव नागणे, दत्ता नागणे आदी उपस्थित होते. माढ्यात लोकसभेसाठी ‘स्वाभिमानी’चा उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी मोठ्या ताकदीने लढणार आहे. पूर्वीपेक्षा सक्षम व ताकदवान उमेदवार दिला जाईल. योग्यवेळी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. यापूर्वी आमदार भालके, परिचारक, जानकर यांना उमेदवारी देऊन त्यांची पिपाणी वाजवण्याचे काम केले. यापुढे कोणाची पिपाणी वाजवणार नाही. स्वाभिमानीवर प्रेम करणाऱ्या आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल, असेही खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com