राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव

राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नेता अशी बिरुदावली मिरविणाऱ्या स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगेल लोकसभा मतदारसंघात इतिहास रचला. तब्बल ७० हजारांहून अधिक मतांचे अधिक्‍य घेत खासदार शेट्टी यांचा एकतर्फी पराभव केला. शेट्टी यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मंडलिक यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसचे आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा एकतर्फी लढतीत तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव करीत खळबळ उडवून दिली. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंडलिक यांना केलेली मदत या मतदारसंघात निर्णायक ठरली.

सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरात दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी सुरु झाली. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेचे मंडलिक यांनी प्रत्येक फेरीत दहा ते पंधरा हजार मतांची आघाडी घेतली. जशा फेऱ्या वाढतील, तशी आघाडीही वाढत गेली. दुपारी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर तब्बल दोन लाखाहून अधिक मतांचे अधिक्‍य घेतले. संपूर्ण मतमोजणीत महाडिक यांनी मंडलिक यांना कुठेच फाईट दिल्याचे आढळले नाही.

निकालापूर्वी जोरदार रान उठविलेल्या या लोकसभा मतदारसंघातील लढतीने प्रत्यक्ष निकालात मात्र एकतर्फी कल दिला. यामुळे पहिल्या काही तासातच निवडून कोण येते यापेक्षा लिड किती मिळते हीच उत्सुकता राहिली. विजय निश्‍चित झाल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध गावात भाजपा- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्यात लक्षवेधी ठरणारा निकाल म्हणून गणल्या गेलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली. सर्वच एक्‍झीट पोलमध्ये विजयाची पसंती दिलेल्या राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र व युतीचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांनी अनपेक्षित पराभव करुन धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणाऱ्या शेट्टी यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरणार आहे.

निवडणूका जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार शोधण्याची कसरत भाजपा युतीला करावी लागत होती. राष्टवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माने यांना युतीने उमेदवारी दिली. भाजपाने पूर्ण ताकद लावून शेट्‌टी यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी ठरले. मतमोजणीत शेट्‌टी एकदाही माने यांची आघाडी तोडू शकले नाहीत. शेट्टी यांच्या पराभवामुळे संपूर्ण ऊस पट्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत स्मशान शांतता पसरली.

सांगलीत भाजपचे संजय पाटील विजयी

सांगली लोकसभा मतदारसंघातून दुपारी तीननंतर संजय पाटील हे १ लाख मतांनी आघाडीवर होते. तर दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील होते. संजय पाटील यांच्या विजयाची शाश्‍वती वाढल्याने कार्यकत्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

मतमोजणी मिरज येथील शासकीय गोदामात गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे एक तासाहून अधिक वेळाने मत मोजणीस प्रारंभ झाला. त्यामुळे मतमोजणी स्थळी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरू झाली.

सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे कल साधारण साडेदहापासून येण्यास सुरवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजपचे संजय पाटील यांना ४ लाख ७४ हजार २८० मते मिळाली. संजय पाटील १ लाख ४९ हजार ९५४ मतांनी आघाडीवर होते. सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत पाटील यांनी बाजी मारली. विशाल पाटील यांनी ३ लाख २४ हजार ३२३, तर गोपिचंद पडळकर यांनी २ लाख ७३ हजार ९०० मते मिळविली.

मतमोजणी केंद्र असलेल्या मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामाकडे येणारे कार्यकर्ते पोलिसांनी मिरज रस्त्यावरच रोखले. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता. निकालाचे कल दुपारनंतरच स्पष्ट होणार, असे आधीपासून प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे सकाळी फारशी गर्दीही झाली नाही. सुरवातीच्या फेरीत तीनही उमेदवार एकमेकाला घासून वाटचाल करीत होते. मात्र संजय पाटील यांनी आघाडी कायम ठेवत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com