राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट

राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट
राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन चिट

नागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी लादलेल्या राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस या हंगामात परवानगी देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या चाचण्यांमध्ये हे वाण पास झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. एचटी सीड प्रकरणात कावेरी सीड्सला देखील क्‍लीन चिट देण्यात आली आहे.  कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३५ लाख रुपयांचा भरणा करण्याचे आदेश राशी कंपनीला देण्यात आले होते. परंतु, रकम भरपाईस टाळाटाळ होत होती. त्याची दखल घेत शासनाकडून संबंधित कंपनीच्या राशी ६५९ या वाणाचे नमुने घेत त्याच्या प्रक्षेत्र चाचण्यांचे आदेश देण्यात आले. कृषी विद्यापीठस्तरावर या ट्रायल घेण्यास सांगण्यात आले होते. चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत या वाण विक्रीस बंदी घालण्यात आली होती.  गेल्या हंगामात घडलेल्या घडामोडीमुळे कंपनीला चांगला फटका बसला. कृषी विद्यापीठस्तरावरील चाचण्यांचे अहवालदेखील सकारात्मक आल्याने येत्या हंगामात राशी ६५९ या वाणाच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  नागपूर जिल्ह्यात 'जादू' आणि 'एटीएम' असा पाकिटावर उल्लेख असलेले बियाणे पकडण्यात आले होते. चाचणीत हे बियाणे एचटी (हर्बीसाईड टॉलरंट) असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कावेरी सिडसचे जादू आणि एटीएम हे वाण सशंयाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु, कृषी विभागाच्या पडताळणीत पकडण्यात आलेल्या एचटी सिडसचा या कंपनीशी काही संबंध नसल्याचा खुलासा झाला. त्यामुळे कावेरी सिडसला देखील कृषी विभागाने क्‍लीन चिट दिली आहे.   राशी ६५९ या वाणांच्या विक्रीस येत्या हंगामात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर येथील कारवाईत पकडलेल्या जादू आणि एटीएम या एचटी बियाण्यांचा कावेरी सीडस कंपनीसोबत काही संबंध नसल्याचे समोर आले आहे. - एम. एस. घोलप, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्‍तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com