जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर

जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिर

जळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात स्थिर राहिले. रावेर भागात नवती केळीला प्रतिक्विंटल १०६० रुपये तर जळगाव भागात १०२५ रुपये दर मिळाले. दरात फारसे चढउतार झाले नाहीत. सणासुदीमुळे कमी दर्जाच्या (वापसी) केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. राजस्थान, छत्तीसगड, नागपूर येथे क्रेटमधून कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली.

पिलबाग केळीची कापणी रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात जवळपास आटोपल्याने पिलबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर करणे रावेर बाजार समितीने थांबविले आहे. कांदेबाग केळीची कापणी हव्या त्या प्रमाणात सुरू झालेली नाही. यामुळे रावेर बाजार समितीने कांदेबाग केळीचे दर जाहीर करायला सुरवात मागील आठवड्यातही केली नाही.

अर्ली कांदेबाग केळीची कापणी मात्र चोपडा, जळगाव, जामनेरात सुरू होती. रावेरात नवती केळीची कापणीही अंतिम टप्प्यात आहे. यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात बॉक्‍समध्ये पॅकिंगसाठी आवश्‍यक केळीचा पुरवठा काहीसा कमी झाला. या भागात मागील आठवड्यात प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर जळगाव, चोपडा, जामनेर व पाचोरा भागात प्रतिदिन २०० ट्रक केळीचा पुरवठा झाला. कमी दर्जाच्या केळीचा पुरवठा कापणी अंतिम टप्प्यात असलेल्या बागांमधून अधिक झाला. स्थानिक व्यापाऱ्यांनी या केळीची खरेदी अधिक प्रमाणात केली.

ठाणे, कल्याण, पुणे येथून बऱ्यापैकी मागणी राहिली. सणासुदीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही खरेदीसंबंधी प्रतिसाद मिळाला. बॉक्‍समध्ये पॅकिंगसंबंधीच्या केळीची सावदा (ता. रावेर) येथील व्यापाऱ्यांकडून अधिक खरेदी झाली. पंजाब, काश्‍मिर, दिल्ली, उत्तर प्रदेशात मिळून रोज १५० ट्रक दर्जेदार केळीची पाठवणूक सावदा भागातून झाली. पिलबाग, नवती केळीची कापणी अंतिम टप्प्यात आल्याने दर्जेदार केळी अधिक उपलब्ध होणार नाही.

कडधान्याला कमी दर जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा व अमळनेर येथील बाजारात मूग, उडदाची आवक वाढू लागली आहे. या बाजार समित्यांमध्ये मागील आठवड्यात मिळून प्रतिदिन १००० क्विंटल उडदाची आवक झाली. उडदाला प्रतिक्विंटल ४००० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर मुगाची प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंत आवक झाली. मुगाला प्रतिक्विंटल ३६०० ते ४५०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com