भाजीपाला उत्पादक खचला

उदगाव (ता. शिरोळ) येथे कोबी काढून तो खतासाठी वापरण्यात येत आहे
उदगाव (ता. शिरोळ) येथे कोबी काढून तो खतासाठी वापरण्यात येत आहे

कोल्हापूर : एकेकाळी भाजीपाल्याचे वैभव शिरावर घेऊन संपूर्ण जिल्ह्यात संपन्नतेचा मुकुट परिधान केलेला जिल्ह्यातील पूर्व भागाचा शिरोळचा पट्टा. मुंबईच्या बाजारपेठेत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेली या तालुक्‍यातील भाजीपाला उत्पादनातील अग्रेसर गावे. लाखो रुपयांची उलाढाल करणारे भाजीपाला उत्पादक संघ. ही शिरोळ तालुक्‍यातील भाजीपाला उत्पादकांची ख्याती; पण गेल्या काही दिवसांपासून मनाने अगदी निश्‍चयी असलेला, सहजा सहजी हार न मानणारा भाजीपाला उत्पादक पूर्णपणे खचून गेलाय.

एका हंगामात दर नाही लागला तर दुसऱ्या हंगामात तो भरून काढू, अशा अपेक्षेत भाजीपाल्याची आस न सोडणारा भाजीपाला उत्पादक आता भाजीपाल्याची काढणी परवडेना म्हणून जीवापाड जपलेला, तरारून आलेल्या भाजीपाल्यावर चक्क ट्रॅक्‍टर फिरवतो, भाजीपाला शेतात गुरे सोडतो, तेव्हा भाजीपाला दराची अनिश्‍चिता मनाचा ठाव घेऊन जाते. दर नसलेल्या भाजीपाल्याची पाहणी करताना तो नष्ट करण्यासाठी चाललेले प्रयत्न मन विषण्ण करतात. राज्याच्या सर्वच बाजारपेठांत टोमॅटो, फ्लॉवर, कोबीला कवडीमोल दर मिळत आहे. ज्या भाजीपाल्याने समृद्ध केले तोच भाजीपाला आता नुकसानीचे कारण ठरत आहे. 

मन हेलावणारी स्थिती  शिरोळ तालुक्‍यातील कोथळी, नांदणी, उदगाव, उमळवाड, दानोळी या गावांचे रुपडे भाजीपाल्याने पालटले; पण सध्या या गावातील भाजीपाल्याची स्थिती भयानक आहे. शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवत असल्याचे वेदनादायी दृश्य प्रत्येक शिवारात दिसते. अनेक वर्षे भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर असणारे नांदणी येथील विजय संभुशेटे यांनी उत्पादन खर्च परवडत नसल्याने फ्लॉवरवर ट्रॅक्‍टर चालवून त्याचा उपयोग हिरवळीचे खत तयार करण्यासाठी केला आहे. या संपन्न गावातील अनेक शेतकरी आता हेच अनुकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

विक्रीसाठी नाही, तर खतांसाठी काढणी  उदगाव हेही भाजीपाला पट्ट्यातील गाव. येथील अजित मगदूम हे शेतकरी तरारून आलेला कोबी काढून टाकण्यात व्यग्र होते. मार्केटसाठी काढण्यात येणारा कोबी आता खत तयार करण्यासाठी काढण्यात येत होता. माल पॅकिंग करण्याऐवजी तो जमिनीत कसा गाडला जाईल याचेच प्रयत्न होत होते. त्यांना दोन दिवसांपूर्वीच मार्केटमध्ये ५० किलोच्या पोत्याला २५ रुपये दर मिळाला. हा दर आहे की चेष्टा असाच त्यांचा सवाल होता. शेतकऱ्याला किती वेड्यात काढावे याची परिसीमाच उरली नसल्याचे त्यांच्या संभाषणातून दिसून येत होते. भाजीपाल्याची अशी अवस्था होत असेल, तर शेतकरी उभा राहणार तरी कसा? असाच सवाल यानिमित्ताने निर्माण होत होता. एकेकाळी दानोळी गावचे वैभव असणाऱ्या टोमॅटोबाबतही हीच स्थिती आहे. दर नसल्याने वैतागलेल्या भाजीपाला उत्पादकांनी उसाची कास धरली आहे; पण जे मोजकेच प्लॉट आहेत. त्यांनाही यंदा नुकसानीने सोडले नाही. अनेकांनी टोमॅटो काढून बाहेर फेकले आहे. कधी शंभर रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता दोन रुपये किलोनेही घ्यायला कोण तयार नाही, अशी खंत या भागातील शेतकऱ्यांची आहे.  

हमीभाव म्हणजे काय रे भाऊ? आज सगळीकडे हमीभावाची चर्चा आहे; पण भाजीपाल्याकडे कोणाचेच लक्ष नाही. नगदी पीक असल्याने भाजीपाल्याला शासन हमीभाव देत नाही. यामुळे शासनाकडून तर पुरता अपेक्षाभंग झाला आहे. लाखो रुपये खर्च करून भाजीपाला पिकवायचा आणि हमीभाव असलेल्या पिकांपेक्षाही कमी दरात विकायचा अशी स्थिती आली आहे. तरीही एखादा लोकप्रतिनिधी याबाबतीत तोंड उघडायला तयार नाही. कृषी विभागात तर कोणत्या गावात कोणत्या पिकाचे किती क्षेत्र आहे, याची नोंदही नाही. यावरून या लोकप्रतिनिधी आणि विभागाची भाजीपाला उत्पादकांकडे पाहाण्याची उदासीनता दिसून येते, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com