दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !

दूध
दूध

पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून भुकटी व बटरचे दरदेखील वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या दुग्धविकास आयुक्तालयाने घेतली आहे.  शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघांकडून कमी दर दिला जात होता. त्यासाठी अनुदान योजना सुरू केली गेली. अनुदान सुरू करण्यापूर्वी असलेल्या समस्या आता दूध उद्योगासमोर नाहीत. बाजारपेठेत प्रक्रिया पदार्थांचे भाव वाढले, अतिरिक्त दूधदेखील घटले आहे. त्यामुळे आता भाव वाढवून न दिल्यास ती शेतकऱ्यांची लूट ठरेल, असा दावा दुग्धविकास खात्याच्या सूत्रांनी केला आहे.  “दूध संघांना सरकारने गेल्या एक ऑगस्ट २०१८ पासून तीन महिने प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान वाटले. त्यानंतर पुन्हा पाच रुपये अनुदानाला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. पण, स्थिती सुधारल्याने ही रक्कम तीन रुपये केली गेली. तसेच, ही योजना ३० एप्रिल २०१९ पर्यंत होती. आता दुधाचा कृशकाळ सुरू होऊन तसेच भुकटी, बटरला दरवाढ मिळूनदेखील संघांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे,’’ असे दुग्धविकास खात्याचे म्हणणे आहे. दुग्धविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे गेल्या आठवडयात खासगी व सहकारी दूध प्रकल्पधारकांची बैठक झाली असता शेतकऱ्यांना चांगले दर देण्याचे मान्य केले होते. “आम्हाला अनुदान या पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही, अशी भूमिका प्रकल्पधारकांनी या बैठकीत घेतली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दर वाढवून देणे ही नैतिक जबाबदारी आहे,” असे दुग्धविकास विभागाचे म्हणणे आहे. एक मे २०१९ पासून राज्यातील शेतकऱ्यांना सर्व दूध प्रकल्पधारकांनी प्रतिलिटर २५ रुपयांप्रमाणे दर देण्याची आवश्यकता असल्याचे दुग्धविकास आयुक्तालयाने सूचित केले आहे. “शेतकऱ्यांना किमान २५ रुपये दर मिळवून देण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी, प्रादेशिक उपनिंबधक व सहायक निबंधकांनी दूध प्रकल्पधारकांना सूचना करावी,’’ असे आदेश दुग्धविकास आयुक्तांनी काढले आहेत.  पोकळ आदेशांना महत्त्व नाही दूध उद्योगाने मात्र दुग्धविकास खात्याच्या आदेशाला फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. “दुग्धविकास खात्याच्या पोकळ आदेशांना आता महत्त्व राहिलेले नाही. बाजारपेठेतील स्थिती पाहून, तसेच स्वतःचा नफा सांभाळूनच दुधाला दर देण्याची पद्धत आता घट्ट रुजली आहे. त्यामुळे अमुक एक दर देण्याची सक्ती करण्याचे दिवस आता गेले आहेत. सध्या २३ रुपयांच्या वर भाव देता येणार नाही,” अशी भूमिका एका खासगी दूध प्रकल्पधारकाने व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com