जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकून

जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकून
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकून

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहात गवार, भेंडी व हिरव्या मिरचीची आवक काहीशी कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २४००, भेंडीला १२०० ते २००० आणि गवारीला ३००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

भेंडीची लागवड जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा, जळगाव व एरंडोल या भागांत अधिक केली जाते. परंतु, धरणगाव तालुक्‍यातील धार, पथराड व एरंडोलमधील काही गावांमध्ये आवर्षणप्रवण स्थितीचा फटका या भेंडीला बसल्याने बाजार समितीमधील आवक मागील २० ते २२ दिवसांपासून कमी आहे. सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भेंडीला मिळाला. आवक प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत हाेती. हिरव्या मिरचीची आवक पारोळा, जामनेर व धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा भागातून होते. परंतु धुळे जिल्ह्यातील आवक जवळपास बंद आहे. तिखट बारीक आकाराची मिरची आंध्र प्रदेशातून काही अडतदार मागील २० ते २२ दिवसांपासून मागवित असून, या मिरचीची फक्त रोज चार ते पाच क्विंटल आवक झाली. 

सर्व भागातून मिळून हिरव्या मिरचीची प्रतिदिन २१ क्विंटल आवक झाली. मिरचीला सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारची आवक यावल, जामनेर व पाचोरा भागांतून होत असून, कूस असलेल्या गवारीला अधिक उठाव आहे. गवारीची प्रतिदिन तीन क्विंटल आवक झाली. एकच दर गवारीला लिलावात मिळत असल्याची माहिती मिळाली. मेथी, कोथींबीर यांची आवक स्थिर असून, दरात चढउतार होत आहे. 

मेथीला प्रतिक्विंटल १२०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक प्रतिदिन नऊ क्विंटल झाली. कोथिंबीरची आवक प्रतिदिन सात क्विंटल झाली. कोथिंबीरला प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक रोडावली. टोमॅटोची प्रतिदिन १२ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला कमाल १६०० रुपयांपर्यंतचा दर राहिला. बोरांची आवक कमी झाली असून, प्रतिदिन आठ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर होता.

कांदेबाग केळीची आवक जळगाव, चोपड्यात घटली कांदेबाग केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव, चोपडा व जामनेर भागांत कांदेबाग केळीची काढणी जवळपास संपली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणीदेखील अंतिम स्थितीत असून, यामुळे कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर करणे रावेर येथील बाजार समितीने बंद केले आहे. आगाप लागवडीच्या नवती केळीची काढणी पाचोरा, रावेर व यावल भागांत सुरू असून, नवतीचे दर मागील सप्ताहात ९७० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर राहिले, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com