धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २०० रुपयांनी वधारला

मक्‍याचा कडबा दरवर्षी मुबलक असायचा. यंदा तो कमी आहे. त्यामुळे कडबा महागला असून, रावेर, पाचोरा, धुळे भागातील शेतकरी कडबा घेण्यासाठी आमच्या भागात येत आहेत. - गणेश पाटील, शेतकरी, कठोरा, जि. जळगाव.
मका चारा
मका चारा
जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसतानाच आता महागडा मक्‍याचा कडबा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यंदा (रब्बी) मक्‍याचा कडबा शेकड्यामागे २०० रुपयांनी वधारला आहे. 
 
धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात चारा महागला असून, दूध उत्पादकांना मिळेल तेथून कडबा विकत घेऊन त्याची वाहतूक करून घ्यावी लागत आहे. यंदा धुळे जिल्ह्यात फक्त आठ हजार हेक्‍टरवरच मक्‍याची लागवड होती.
तीदेखील शिरपूर तालुका व शिंदखेडा तालुक्‍यातील तापी काठालगत झाली होती.
 
जळगाव जिल्ह्यात सुमारे २९ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. दरवर्षी रावेर, यावल भागात लागवड अधिक व्हायची. परंतु या तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांनी केळी व कापसासाठी बेवड म्हणून हरभऱ्याला पसंती दिली. कारण मक्‍याला पाणी व खर्चही अधिक लागतो. मक्‍याची लागवड चोपडा, जळगाव, पाचोरा, मुक्ताईनर, जामनेर, धरणगाव या भागातच झाली होती. पाण्याचे चांगले कृत्रीम स्रोत असलेल्या रावेर व यावल भागातच मका लागवड कमी असल्याने मक्‍याचे उत्पादन व चाराही कमी आला आहे. परिणामी कडबा महागला आहे. 
 
कडब्याची शोधाशोध शेतकरी करीत आहेत. कारण हरभऱ्याचे कुटार दुभत्या पशुधनाला रोज खाऊ घालता येत नाही. मक्‍याच्या कडब्यासाठी धुळे, रावेर भागातील शेतकरी चोपडा, जळगाव भागात येत असून, १४०० रुपये शेकडा, असा दर शेतातच देत आहेत. शेतातच कुट्टी करून खरेदीदार ट्रक व ट्रॅक्‍टरने वाहतूक करून घेत आहेत. 
 
मागील वर्षी मक्‍याचा कडबा १२०० रुपये प्रतिशेकडा, या दरात उपलब्ध झाला. रावेर, यावल भागात तर ११०० रुपये प्रतिशेकडा असे दर काही शेतकऱ्यांनी घेतले. 

दादरचा कडबा शोधूनही सापडत नाही. कारण दादरची पेरणी फक्त तापीकाठावरील चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, शिंदखेडा व शिरपूर भागात झाली होती. जळगाव तालुक्‍यातील आसोदे, भादली, नशिराबाद, कडगाव या काळी कसदार जमीन असलेल्या भागातही पेरणी झाली होती.

परंतु दादरचा कडबा शेतकरी आपल्या पशुधनासाठी ठेवतात. तो विकत नाही. दादरचा कडबा कसदार असतो व तो अधिक वेळ टिकतो, असे शेतकरी मानतात. दादरचा कडबा ३६०० रुपये प्रतिशेकड्यापर्यंत आहे. मागील वर्षीही ३५०० रुपये प्रतिशेकड्यापर्यंत दर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com