आंतरराष्ट्रीय बाजारात रुईला ‘ऑन’चे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात रुईला ‘ऑन’चे दर

जळगाव ः आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातही केळी बाजारपेठेप्रमाणे गुणवत्तापूर्ण कापूस किंवा रुईला ऑनचे दर मिळत आहेत. भारतातील गुणवत्तापूर्ण कापसाच्या खंडीला (३५६ किलो रुई) ४१००० रुपये दर मिळत आहे. बाजार स्थिर असून, निर्यातीत चीननेही उडी घेतल्याने गुणवत्तापूर्ण कापसासंबंधीची स्पर्धाही निर्माण झाली आहे. याचवेळी बाजारात थोडा दबावही वाढला आहे. चीनमधील शांघाय येथे सूत व कापड यासंबंधी आयोजित चायना फेअरमध्ये चीनने आपल्याला परवडणाऱ्या पाकिस्तान व बांगलादेशच्या सुतामध्ये रस दाखविल्याची माहिती जाणकार, अभ्यासकांनी दिली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या खंडीला ४२००० रुपयांवर दर आहे. अमेरिकेतून आजघडीला सुमारे १३० लाख गाठींची निर्यात झाली आहे, तर भारतातून ४५ लाख गाठींची निर्यात झाली. निर्यात व आयात खुली असून, जेवढी निर्यात आहे, त्याच गतीने आयातही सुरू आहे. न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स ८३ सेंटवर स्थिर असतानाही देशाअंतर्गत बाजारात फारशी दरवाढ झालेली नसल्याची माहिती मिळाली.  भारत यंदा सर्वांत मोठा कापूस उत्पादक देश म्हणून समोर आलेला असला तरी महाराष्ट्र, तेलंगण, मध्य प्रदेशात गुलाबी बोंड अळीने कापसाचे उत्पादन घटले, तसेच गुणवत्तेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. जी गाठ २९ मिलिमीटर लांब, चार मायक्रोनीयर, फक्त दोन टक्के ट्रॅश (कचरा) आणि ८० टक्‍क्‍यांवर शुभ्र आहे, तिला अधिकचे दर मिळत आहेत. अमेरिकेच्या गाठींना १० ते १२ टक्के अधिक दर मिळत असून, भारतीय बाजारातील गुणवत्तापूर्ण गाठींनाही सहा टक्‍क्‍यांपर्यंत जादा दर मिळत आहेत. अशातच चीनने आपला एक कोटी गाठींचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) मागील सोमवारी (ता.१२) विक्रीला काढला. काही आशियाई देश चीनकडे गाठींच्या आयातीसंबंधी गेले आहेत. मागील तीन चार दिवसांत प्रतिदिन सुमारे तीन हजार मेट्रिक टन एवढ्या सुताची विक्री चीनने केली आहे. तरी बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, तुर्की, कझाकिस्तान येथे भारतातून निर्यात सुरू असून, ४५ लाख गाठींची निर्यात या देशांमध्ये झाली आहे.   शांघायमध्ये सूत व कापड उद्योजकांसंबंधी चायना फेअर शुक्रवारी (ता.१६) पार पडला असून, त्यात आशिया व इतर भागातील जवळपास १९ देशांमधील उद्योजक सहभागी झाले. सुताच्या आयातवाढीचे सूत्र चीनने मांडले,, परंतु सुरवातीला कमी मार्जीनवर व्यवहार करण्याचा प्रस्ताव तेथे ठेवण्यात आला. उत्तम दर्जाच्या सुताची १८० रुपये किलोने तेथे मागणी करण्यात आली. बांगलादेश व पाकिस्तानमधील सूतगिरण्यांनी या दरात व्यवहारांना तयारी तेथे दाखविली आहे. या चायना फेअरमुळे आता दुय्यम दर्जाच्या सुताचे साठे मोकळे होतील, अशी माहिती मिळाली. ​उत्पादन व निर्यातीचा आलेख अमेरिका अमेरिकेचे अपेक्षित कापूस उत्पादन २३५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) अमेरिकेतील निर्यात १३० लाख गाठी भारत भारतातील अपेक्षित कापूस उत्पादन ३६७ ते ३७० लाख गाठी भारतातील आतापर्यंतची निर्यात ४५ लाख गाठी आॅस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे अपेक्षित कापूस उत्पादन ६७ लाख गाठी ऑस्ट्रेलियामधील निर्यात ४१ लाख गाठी प्रतिक्रिया शांघायमधील चायना फेअरमुळे पाकिस्तान, बांगलादेशमधील दुय्यम दर्जाचे सूतविक्री होण्यास चालना मिळेल. बांगलादेश भारतातून आणखी गाठींची आयात करील. सुतासह रुईचे दर स्थिर आहेत.  - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार आंतरराष्ट्रीय कापूस बाजारही गुणात्मक रुईचा आग्रह करीत आहे. गुलाबी बोंड अळीने कापूस उद्योगासमोर अनेक प्रश्‍न उपस्थित केले असून, हा त्याचाच परिणाम आहे. पुढे जे गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन घेतील, त्यांना अधिकचे दर मिळतील असे वाटते.  - अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com