नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची विक्रमी आवक

माझ्याकडे पाण्याचा चांगला स्त्रोत असल्याने मिरचीचे चांगले उत्पादन यंदा मिळाले आहे. एकरी सरासरी १५० क्विंटल फक्त ओल्या लाल मिरचीचे उत्पादन आले. हंगाम मार्चपर्यंत सुरू राहील. मागील हंगाम प्रतिकूल वातावरणाने डिसेंबरमध्येच संपला होता. जेथे दुष्काळी स्थिती आहे, तेथे मात्र स्थिती बिकट आहे. दर मागील १५ - २० दिवसांपूर्वी बऱ्यापैकी होते. सद्यःस्थितीला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये दर ओल्या लाल मिरचीला मिळत आहे. - प्रनील पाटील , मिरची उत्पादक, पळाशी, जि. नंदुरबार.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा फटका बसलेला असतानाच दुसरीकडे नंदुरबार व नजीकच्या गुजरातमधील मिरची पिकाला मात्र मोठा लाभ झाला असून, सिंचनाचे मजबूत स्त्रोत असलेल्या मिरची उत्पादकांना ओल्या लाल मिरचीचे एकरी सरासरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. परिणामी, ओल्या लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या बाजार समितीमध्ये मिरची आवकेचे मागील विक्रम मोडीत निघाले असून, डिसेंबरच्या मध्यापर्यंत एक लाख क्विंटल केवळ ओल्या लाल मिरचीची आवक झाली. सध्या या बाजार समितीत प्रतिदिन सरासरी ३००० क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक होत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात सुमारे २२०० हेक्‍टरवर मिरचीची लागवड जून व जुलै महिन्यात झाली होती. ऑगस्टअखेर हिरव्या मिरचीची काढणी सुरू झाली. मग ऑक्‍टोबरपासून झाडावर लाल होणाऱ्या ओल्या लाल मिरचीची काढणी सुरू झाली. मिरची पिकाला निरभ्र व थंड वातावरण अनुकूल ठरले. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सिअवर गेले नाही. तर, जानेवारीतही थंडी टिकून राहिल्याने पीक जोमात आहे. नंदुरबार तालुक्‍यातील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे मजबूत स्त्रोत आहेत, त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. परंतु, काही शेतकऱ्यांसमोर कमी पाण्याचे संकट उभे राहिले.  नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पळाशी, धमडाई, पथराई, लहान शहादे, कोळदा, बामडोद, भवाली, नळवा, शिंदे आदी गावांमधील अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा फटका बसला. 

तापी काठावरील सावळदा (ता. शहादा), गुजरातमधील तापी जिल्ह्यातील वेळदा, वाका, अंतुर्ली, शेलू, चिचोदा, देव्हाळा, पिंपळोद, मुबारकपूर, सुलवाडा आदी २० ते २२ गावांमध्येही चांगले उत्पादन मिळाले आहे. शहादा तालुक्‍यातील औरंगपूर येथील विकी पटेल यांना एकरी २०० क्विंटल ओल्या लाल मिरचीचे उत्पादन मिळाले आहे. अजूनही तोडणी सुरू आहे. मागील हंगामात त्यांना १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले होते. मागील वर्षी काही क्षेत्रांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्येच पीक मोडले. यंदा मात्र रोगांचा फारसा प्रादुर्भाव नाही.

यामुळे उत्पादन बऱ्यापैकी हाती आले असून, मार्चपर्यंत हंगाम चालेल. ओल्या लाल मिरचीला नंदुरबार बाजारात सध्या १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळत आहेत. मागील हंगामात २२०० ते ३००० रुपये क्विंटल असा दर होता. यंदा ऑक्‍टोबरपासूनच गुजरातमधील निझर तालुक्‍यातील गावांमधून मोठ्या प्रमाणात ओल्या लाल मिरचीची आवक सुरू झाली. नंदुरबार बाजारात डिसेंबरमध्येच एक लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झाली असून, या आवकेने मागील विक्रम मोडल्याचे बाजार समितीने मध्यंतरी अधिकृतपणे जाहीरही केले.    हिरव्या मिरचीलाही चांगली मागणी  शहादामधील औरंगपूर, सावळदा व गुजरातमधील गावांमध्ये हिरव्या मिरचीलाही उठाव असून, व्यापारी थेट शेतातून १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल या दरात मिरची खरेदी करीत आहेत. आकाराने बारीक, लहान व तिखट असलेल्या या मिरचीला  सुरत (गुजरात) आणि नाशिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या मिरचीचे क्षेत्र कमी असल्याने व्यापाऱ्यांना थेट बांधावर खरेदीसंबंधी जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. 

तापी काठावरील गुजरातमधील गावांमध्ये मिरचीचे विक्रमी उत्पादन यंदा आले असून, ओल्या लाल मिरचीचे किमान १५० ते २०० क्विंटल उत्पादन अनेकांना मिळाले. आमच्याकडे बारीक व तिखट हिरवी मिरची खरेदीसाठी व्यापारी थेट शेतात येत आहेत. सुरत बाजारपेठेत येथून मिरची जाते. ओल्या लाल मिरचीला नंदुरबारच्या बाजारात न्यावे लागते. तेथे लाल मिरचीची यंदा विक्रमी आवक झाली असल्याचे पिंपळोद (जि. तापी, गुजरात) येथील  मिरची उत्पादक तथा बाजाराचे जाणकार योगेशभाई पटेल यांनी सांगितले.

यंदा दुष्काळी स्थितीचा नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मिरची उत्पादकांना फटका बसला. पण, जेथे मुबलक पाणी व चांगले व्यवस्थापन आहे, त्यांनी  एकरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळविले. तापीकाठी स्थिती बरी आहे. निरभ्र वातावरण अनेक ठिकाणी फायदेशीर ठरत असले, तरी किमान व कमाल तापमानात १५ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत राहिल्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसत आहे, असे कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील  विषय विशेषज्ञ आर. एम. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com