आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूल

आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूल
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूल

तासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून आरफळची पाणीपट्टी वसुली थांबवावी, यासाठी  शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही प्रशासनदरबारी ‘दाद ना फिर्याद'' अशी त्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. किती शेतकऱ्यांचे किती रुपये गोळा केले, याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली कार्यकर्त्यांनी मागवली आहे. 

तासगाव तालुक्‍यातील शेतकरी भीषण दुष्काळाला तोंड देत आहेत. दुष्काळाच्या सवलती लागू झाल्या आहेत. असे असताना साखर कारखान्यांकडून उसबिलातून एकरी ५ हजार रुपयांप्रमाणे ‘आरफळ''ची पाणीपट्टी वसूल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसबिले अदा करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार ही करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. तासगाव तालुक्‍यातीळ विसापूर, आळते, शिरगाव, राजापूर, बोरगाव, लिंब, तुरीची या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांना कारखान्यांनी दिलेल्या उसबिलातून ही वसुली झाली आहे. 

विशेष म्हणजे आरफळ योजनेला कुठेही विजेचा वापर नाही. थेट कण्हेर धरणातून हे पाणी तासगाव तालुक्‍यात आणले आहे. शिवाय पाणीपट्टीचे दरही अतिशय कमी आहेत. असे असताना चक्क एकरी ५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाल्यानंतर त्यातून आपले पैसे कापून घेतल्याचे समजले. पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकरी विरोध करत नाहीत, तर कोणतेही आणि कसलेही नियोजन, माहिती नसताना हजारो रुपयांच्या केल्या जाणाऱ्या वसुलीला विरोध आहे. किती वसूल झाले आणि किती भरले, याचीही माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

पाणी नेमके कोणत्या योजनेचे? आपल्याला पाणी नक्की कोणत्या योजनेतून मिळते, हे कधी परिसरातील शेतकऱ्यांना समजलेले नाही. कारण एकाच कॅनॉलमधून कधी आरफळचे, तर कधी टेंभू योजनेचे पाणी सोडले जाते. तोच प्रकार येरळा नदीत पाणी सोडण्याचा आहे. या नदीत पाणी सोडावे म्हणून आमदार सुमन पाटील यांना उपोषण करावे लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com