राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या पीककर्जाबाबत उदासीनतेमुळे संताप

राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या पीककर्जाबाबत उदासीनतेमुळे संताप
राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या पीककर्जाबाबत उदासीनतेमुळे संताप

कोल्हापूर : संपन्न असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही कर्जवाटप करताना राष्ट्रीयीकृत बॅंकानी काणाडोळाच केला आहे. आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला कर्जाशिवाय पाठवत नाही, अशी वल्गना राष्ट्रीय बॅंकाचे पदाधिकारी करीत असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही करताना अनेक कागदपत्रांबरोबरच अविश्‍वासाचे बोलणे शेतकऱ्यांना खावे लागत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडेच पाठ फिरवली आहे.

जाचक अटी व विलंबाला कंटाळून शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकांनाच प्राधान्य दिले आहे. जिल्हा बॅंकेने तब्बल ८० टक्के तर राष्ट्रीयीकृत बॅंकानी उणुपुरे ८ टक्के कर्जवाटप केल्याचे सामोरे आले आहे. यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य असे केवळ म्हणणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकाची कर्जपुरवठ्याबाबतची भूमिका, या आकडेवारीने सामोरी आली आहे.

आताच माफी झाली आता पुन्हा कर्ज कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २७ हजार ९७२ थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळण्यासाठी प्रसंगी उधार उसनवार करुन उर्वरित रक्कम फेडली आहे. यामुळे या योजनेचे लाभ घेतलेले शेतकरी अजूनही कर्जाच्या विळख्यातच आहेत. त्यांना पुन्हा कर्जाची गरज आहे; पण बॅंका दारात उभे करून देत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. आताच माफी झाली आता पुन्हा कर्ज तातडीने देणे शक्य नसल्याचे अनेक बँकांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.

कारवाईच्या बडग्याने फरक पडणार का? पीक कर्जवाटपातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या तफावतीने हैराण झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दिष्टाइतके कर्जवाटप करा अथवा शासकीय खाते बंद करतो, असा दम दिला असला तरी त्याचा तातडीने त्याचा परिणाम होईल याची शक्‍यता कमी आहे. जिल्हा बॅंकेने कर्जवाटपातील सुमारे ८० टक्के हिस्सा उचलला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका आता कर्ज घ्या म्हणून शेतकऱ्यांकडे कसे जातील असाच प्रश्‍न आहे. कारण सोसायट्यांच्या माध्यमातून बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली आहे. यामुळे नव्या कर्जासाठी शेतकरी राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या जाचक अटी स्वीकारण्यास तयार होतील का, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

उशिरा जाग खरं तर बॅंकाचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रशासनाकडून याबाबत तातडीने सूचना व्हायला हव्या होत्या. परंतु आता खरीप हंगाम सुरू झाल्यावर बॅंकाची उदासीनता लक्षात आल्यानंतर प्रशासनाने या बॅंकावर कारवाईचा बडगा उचलला आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत लाभ होईल का, याबाबत साशंकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर अजूनही कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हालचाली केल्या नसल्याचे चित्र सध्या आहे.

सिस्टीममुळे सहकारी बॅंकाना फायदा सेवा सोसायट्यांच्या गाववार जाळ्यामुळे जिल्हा बॅंकेसारख्या सहकारी बॅंकानी कर्जवाटपाबरोबर वसुलीतही प्रगती केली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या तुलनेत सहकारी बॅंकाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारी चांगली वागणूक, सवलत यामुळे अनेक शेतकरी सेवा सोसायट्यांमधूनच कर्ज घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे नजीकच्या काळात शेतकऱ्यांचा विश्‍वास मिळविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोर आहे.

दृष्टिक्षेपात कोल्हापूर जिल्ह्याचे कर्जवाटप - पीक कर्जवाटप उद्दिष्ट ः १३८९ कोटी - कर्जवाटप : ६३९ कोटी - राष्ट्रीयीकृत बॅंकांना उद्दिष्ट ः ४४९ कोटी - राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून वाटप ः ३८ कोटी - उर्वरित कर्जवाटप जिल्हा बॅंकातून - कर्जदार : ६० हजार ५७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com