नियमित पुरवठ्यातून सेंद्रिय उत्पादकांना आर्थिक स्थैर्य

सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्याविषयी बैठकीत मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.
सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्याविषयी बैठकीत मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.

पुणे : सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन रासायनिक अवशेषमुक्त उत्पादन घ्यावे. त्याचबरोबर सातत्य ठेवून बाजारपेठांना त्यांचा नियमित पुरवठा केल्यास सेंद्रिय उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळवता येईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतेच व्यक्त केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी कंपन्या, गट प्रतिनिधी आणि निर्यात-पणन क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिनिधींची विशेष बैठक झाली. प्रगतशील शेतकरी अंकुश पडवळे (मंगळवेढा), प्रल्हाद वरे (बारामती), स्वाती शिंगाडे, संतोष राऊत, आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर,  सतीश कानवडे, संतोष राऊत, कल्याण काटे, राज तुंगळे, निर्यातदार आकाश बन्सल आदी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी संवाद साधताना सांगितले, की सेंद्रिय शेतीपुढे सध्या अनेक समस्या आहेत. मात्र संघटितपणे सेंद्रिय शेती उत्पादनाचा एकच ब्रँड बनविल्यास "शेतकरी ते ग्राहक" साखळी मजबूत होऊन दोघांचाही फायदा होणार आहे. अनेक निर्यातदार व स्थानिक सुपर मार्केटस सेंद्रिय उत्पादने घेण्यास उत्सुक आहेत. गुणवत्तापूर्ण, रासायनिक अवशेषमुक्त मालाची हमी आणि सातत्याने पुरवठा या त्यांच्या अटी आहेत. शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्तीने मार्केटचा अभ्यास करावा व सेंद्रिय बाजारपेठेची गरज पूर्ण करावी. अशोक बन्सल, आनंद शेज्वल, ‘इकोफ्रेश’चे प्रशांत मोरनकर यांनीही सेंद्रिय उत्पादनांना देशात व परदेशातही मोठी मागणी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची अपेक्षा बैठकीत व्यक्त केली. सेंद्रिय उत्पादकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने शासनाने ‘आॅनलाइन पोर्टल’ उभारण्याची गरज पडवळे यांनी व्यक्त केली.  ‘राज्याचा एकच ब्रँड तयार करणार’  बैठकीत शेतकरी प्रतिनिधी अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे व स्वाती शिंगाडे यांनी सेंद्रिय शेतीपुढील अडचणी मांडल्या. राज्यातील सेंद्रिय शेतकरी उत्पादक व रासायनिक अवशेषमुक्त शेती करणारे एकत्र येणार आहेत. ज्याप्रमाणे सिक्कीमचा सेंद्रिय शेतीचा ब्रॅंड तयार झाला. त्याच प्रकारे सर्वांच्या प्रयत्नांमधून सेंद्रिय उत्पादनांचा आपल्या राज्याचाही एकच ब्रँड तयार करण्यात येणार असल्याचे पडवळे म्हणाले. त्यासाठीच्या कार्यपद्धतीचा पुणे शहरातून प्रारंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीतील प्रमुख मुद्दे 

  • राज्यभरात विखुरलेले असंघटित सेंद्रिय शेती उत्पादक व शेतकरी कंपन्या यामध्ये परस्पर समन्वयाचा अभाव.
  • सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी सक्षम यंत्रणा, कार्यपद्धती नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडने अशी शासकीय यंत्रणा उभी केली आहे.
  • वाहतूक, दळणवळणाच्या मर्यादित सुविधा, व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. मार्केटिंगमध्येही पिछाडी.
  • शेतमाल उत्पादनात वैविध्य, परंतु मागणीनुरुप पुरवठ्यास मर्यादा. 
  • सातत्याने माल पुरवठा करण्याची शाश्वती नसणे. यामुळे निर्यातदार जोडणे कठीण होते. 
  •  सेंद्रिय माल साठवणूक तंत्राचा वापर व प्रसार नसणे, माहिती तंत्रज्ञान अवगत नसणे, शीत साखळीच्या मर्यादा. 
  • शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मर्यादा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com