‘चणकापूर'चे आवर्तन ‘गिरणा’त सोडणार : जिल्हाधिकारी

‘चणकापूर'चे आवर्तन ‘गिरणा’त सोडणार : जिल्हाधिकारी
‘चणकापूर'चे आवर्तन ‘गिरणा’त सोडणार : जिल्हाधिकारी

नाशिक : ‘‘सटाणा शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीपात्रात पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे.

बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्प व कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन जिल्हा प्रशासनाने थांबविले आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व आरम नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

सध्या शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांची भटकंती सुरू आहे. दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे १० नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबरला पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर, सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. उन्हाळ्यात सटाणा शहरासाठी शंभर दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी चणकापूर धरणातून आवर्तनाने सोडणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी महाराणा प्रताप क्रांतीदलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, हेमंत भदाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

`ओझरखेड`चे आवर्तन सोडण्याची मागणी

ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले.

ओझरखेड कालव्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यंदाही मोठे संकट उभे आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ओझरखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ७०हून अधिक पाणीवाटप सहकारी संस्था आहेत. कालव्यावर अवलंबून शेतकऱ्यांनी द्राक्षबागेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे.

ओझरखेड कालव्यातून चांदवड तालुक्यासाठी ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडीला पाणीपुरवठा केल्यास या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी शरद काळे, माधवराव ढोमसे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते, विठ्ठल कहाने, सारोळे, सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com