साठा मर्यादा हटविल्याने साखरदरात वाढ होण्याची शक्यता

साठा मर्यादा हटविल्याने साखरदरात वाढ होण्याची शक्यता
साठा मर्यादा हटविल्याने साखरदरात वाढ होण्याची शक्यता

पुणे : केंद्र सरकारने साखरेवरील साठा मर्यादा (स्टॉक लिमिट) हटविल्यामुळे पुढील काही महिन्यांत साखरेच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बाजारपेठेच्या सूत्रांनी दिली.  ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, साठा मर्यादा(स्टॉक लिमिट) हटविल्यामुळे बाजारपेठेत तेजीसाठी अतिशय सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मर्यादा हटविताच साखरेचे दर काही तासांत वाढणार नाहीत. मात्र, जानेवारीनंतर दरात किमान प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ अपेक्षित आहे.  ''साखर बाजारातील मागणी व पुरवठ्याचे नियोजन सरकारने लक्षात घेऊन काही बदल केले आहेत. ते चांगले आहेत. यामुळे साखरेचा साठा करण्यास व्यापारी तयार होतील. स्टॉक लिमिट हटविण्याची मागणी असोसिएशनचीच होती व ती मान्य करण्यात आली. त्याचप्रमाणे आता आयातकरदेखील दहा टक्क्यांनी वाढवावा, असेही शुगर ट्रेड असोसिएशनचे म्हणणे आहे.  साखर बाजाराचे अभ्यासक योगेश पांडे यांनी सांगितले, की स्टॉक लिमिट रद्द करण्याचे धोरण स्वागतार्ह आहे. मात्र, हा निर्णय झाल्यामुळे साखरेच्या दरात सध्या काहीही परिणाम झालेला नाही.    "आता व्यापारी स्टॉक करतील. मात्र, बाजारातील उपलब्धतेवर कुठे तरी नियंत्रण हवेच. अन्यथा यातून बाजारात भरमसाठ माल उतरणे किंवा अकारण स्पर्धादेखील होऊ शकते. सरकारने आता बफर स्टॉक करणे किंवा निर्यातीला प्रोत्साहन देणे, असे उपाय न केल्यास पुढे स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे, असे पांडे म्हणाले.  राज्यातील साखर कारखान्यांनी मात्र साखर टप्प्याटप्याने विकावी, असा सल्ला साखर उद्योगातील अभ्यासक व विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिला आहे. ''साखरेचे भाव पुढील काही दिवसानंतर प्रतिक्विंटल २००-३०० रुपयांनी वाढलेले दिसतील. त्यामुळे सध्या प्रतिक्विंटल ३००० ते ३१०० रुपयांनी साखर कारखान्यांचे सुरू असलेले विक्री दर पुढे ३४००-३५०० रुपये होण्यास पोषक स्थिती आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी विक्रीची घाई करू नये, असे श्री. ठोंबरे म्हणाले.  ''साखर व्यापारी फक्त टेंडर काढून रेट ओपन करतात; मात्र माल उचलत नाहीत. त्यामुळे बाजारात चुकीचा संदेश जातो. आमच्या मते गाळप बंद होण्याच्या कालावधीत साखरेचे भाव वाढतील. त्यामुळे साखर कारखान्यांनी भावपातळी पाहून विक्रीचे नियोजन करावे, असाही सल्ला श्री. ठोंबरे यांनी दिला.  साखरसाठा केवळ ३५ लाख टन देशात खूप साखरसाठा आहे, अशी आवई उठविण्यात आली आहे. यंदा देशाचे साखर उत्पादन २५० लाख टन राहण्याचा आमचा अंदाज होता. सरकारचा अंदाज २४९ लाख टनांचा आहे. मुळात आपला सुरवातीचा साठा ७०-७५ लाख टनांचा असतो. पण, यंदा तो केवळ ३५ लाख टनांचा आहे. देशाचा वापर २५५ लाख टनांचा आहे. त्यामुळे देशात भरपूर उपलब्धता किंवा पुढील वर्षी जादा कॅरी फॉरवर्ड स्टॉक राहणे असे काहीही होणार नाही, असे विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी स्पष्ट केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com