कृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार

भविष्यात महाराष्ट्रातीलशेतीचा इतिहास लिहिला जाईल त्याग्रंथामध्ये सोनेरी अक्षराने लिहीलेले एकच नांव असेल आणि ते म्हणजे पद्मश्री आप्पासाहेब पवार. बारामतीच्या भिगवण चौकात गेले असता कृषि विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये हा महान कर्मयोगी कार्यरत असल्याचा अजूनही भास होतो.
कृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार
कृषी ज्ञानप्रसारक आप्पासाहेब पवार

स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच आहेत. असा महान कर्मयोगी बारामती परिसरात होता. त्या कर्मयोगाचे स्मारक बारामती परिसरातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कर्तुत्वाचा दाखला देत उभे आहे. भविष्यात महाराष्ट्रातील शेतीचा इतिहास लिहिला जाईल त्या ग्रंथामध्ये सोनेरी अक्षराने लिहीलेले एकच नांव असेल आणि ते म्हणजे पद्मश्री आप्पासाहेब पवार. बारामतीच्या भिगवण चौकात गेले असता कृषि विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये हा महान कर्मयोगी कार्यरत असल्याचा अजूनही भास होतो. शेती शास्त्राचे संशोधन, प्रगत तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाले तरी वास्तवात आणता येत नाही. त्यामागे अनेक कारणे असतात. ते तंत्रज्ञान प्रयोग खर्चिक असू शकते. त्याच्या यशापयशाचे मुल्यमापन करणे शक्‍य नसते. अशावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करता येत नाही. कृषि विद्यापीठे तसेच शेती संशोधन केंद्र आणि शेतकरी त्यांच्यामुळे माध्यम समन्वय म्हणून तसेच ज्याला शेती शास्त्रात एक्‍सटेन्शन (ज्ञान विस्तार) म्हणतात. अशा संस्थेची निकड लक्षात घेवून या महान कर्मयोग्याने कृषि विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. नवीन तंत्रज्ञानाने शेती उत्पादन व संशोधनाचे प्रात्यक्षिक कृषि तंत्रज्ञान संशोधनाची प्रयोगशाळा प्रतिष्ठानच्या शेतीवर उभी राहिली. दूध उत्पादनाची क्रांती झाली. 10 लिटर दुध जमा करणे अशक्‍य होते, तेथे आज लाखों लिटर दुधाचे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांची मुहुर्तमेढ आप्पासाहेबांच्या कर्तृत्वामुळे रोवली गेली. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्ग सुरू केले. ते स्वतः हातात डस्टर, खडू घेवून उभे राहिले. शेतकऱ्यांना गाईच्या संगोपनाचे धडे त्यांनी दिले. 

शेती, शेतकऱ्यांचे प्रश्‍न हा केंद्रबिंदू समजून हा महान कर्मयोगी अविरत कार्यरत होता. शेतकऱ्यांची तरूण पिढी उद्यमशील व्हावी. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या झोपडीत समृध्दीचे, संपन्नतेचे दिवस यावेत, म्हणून तरूण शेतकऱ्यांना एकत्र करून शेती-विज्ञान मंडळासारखे उपक्रम केले. त्या तरूण शेतकऱ्यांना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर कर्नाटक, बंगळुरू, इस्त्राईलपर्यंत शेती सहलीचे आयोजन केले. त्यांच्या बरोबर एस. टी. ने प्रवास सुध्दा त्यांनी केला. शेती विषयक सहलीचे यशस्वी आयोजन कृषी प्रतिष्ठानमार्फत केले. केवळ दुध उत्पादन नव्हे, तर आधुनिक कुक्कुटपालन, द्राक्ष, डाळींब, बोर, वनशेती, आधुनिक पध्दतीने ग्रीान हाऊसेस, त्यातील फुलशेती वगैरेचे प्रत्यक्ष शेतीतंत्र शेतकऱ्यांना आप्पासाहेबांमुळे शक्‍य झाले. त्यांनी फळबाग संघाची स्थापना करून स्वखर्चाने शितगृह बांधून दिले. या माध्यमातून परिसरातील शेतमाल (द्राक्ष/डाळींब) परदेशात निर्यात होवू लागला. शेतकऱ्यांना वाजवी किंमत मिळू लागली. 

पुराणकाळात ऋषीमुनींचे आश्रम असत. तेथे विद्यादानाचे कार्य चालत असे. तसेच कार्य कृषि विकास प्रतिष्ठानमार्फत चालत आहे. महाराष्ट्रभर या महान कर्मयोग्याचे शिष्यगण पसरले आहेत. सोलापूर जिल्हयातील श्री. कचरे यांचे शेतावर शेती विज्ञान मंडळाची सहल गेली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की या माळरानांत डाळींब, बोर, कलिंगड, टोमॅटोची लागवड केवळ आप्पासाहेबांचे मौल्यवान मार्गदर्शन, त्यांची भाषणे, चर्चासत्रामधील मार्गदर्शन यामुळेच शक्‍य झाले आहे.  असे अनेक शेतकरी त्यांनी घडविले.

छत्रपती कारखाना हा त्यांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय. जन्मदात्या आईपेक्षा त्या संस्थेवर प्रेम करणारी जी कर्तृत्ववात पिढी भवानीनगर परिसरात होवून गेली. त्यापैकी आप्पासाहेब पवार एक होते. छत्रपती कारखान्यासाठी प्राथमिक भागभांडवल गोळा करण्यापासून त्यांचा सहभाग होता. छत्रपती कारखान्याच्या सचिवपदापासून संचालक, कार्यकारी संचालक, चेअरमनपद अशी पदे त्यांनी भुषविली. काटकसर, पारदर्शी अधिकारी म्हणून महाराष्ट्रभर कारखान्याचा व त्यांचा व्यक्तीगत नांव लौकीक होता. 

1951 साली ते कृषि पदवीधर झाले. प्रवरानगर येथील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी कारखान्यामध्ये केवळ 4 रूपये पगारावर ते रूजू झाले. त्या परिसरचा सर्वांगीण विकास त्यांनी केला. त्या परिसरात त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कार्याची पावती म्हणून प्रवरा कारखान्याने त्यांना इस्त्राईलला पाठविले. तेंव्हापासून आप्पासाहेबांनी ईस्त्रायलची शेती, पाणी नियोजन, फलोत्पादन, फुलशेती, मत्स्य उत्पादन वगैंरेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. बारामती परिसरात बारामती ग्रेप इंडस्ट्रिज, बारामती ऍग्रो सारख्या संस्था नावारूपाला आणल्या. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग व्यवसाय केला पाहिजे, म्हणून बारामती औद्योगीक वसाहत, बारामती एम. आय. डी. सी वगैरे सारख्या संस्था निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. केवळ तेवढे करून न थांबता मुलांना रोजगार मिळावा, म्हणून औद्योगीक प्रशिक्षण देणारी संस्था काढली. सिन्नर, पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगीक वसाहती पाहण्यासाठी सहली काढल्या. बारामती परिसरात छोटे उद्योग करण्यासाठी तरूणांना त्यांनी प्रोत्साहित केले. 

भिगवण चौकातील त्यांच्या कार्यालयामध्ये अजूनही ते कार्यरत असल्याचा भास होतो. त्यांचे कार्यालय सदैव गजबजलेले असे. ऑस्ट्रेलियन मिशनच्या मिस ओझर, मिस स्क्‍युज, श्री. बारवकर, श्री. गोरे, श्री. गावडे, श्री. ढवाण वगैरे विश्‍वस्त प्रतिष्ठानच्या भावी योजना संबंधी आत्यंतिक तळमळीने शेतीविषयक प्रश्‍नांची धोरणे तेथे ठरवत आहेत, कुणी त्यांना शेती विषयक परिसंवादासाठी आमंत्रण देण्यासाठी आलेला आहे, तर कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आलेला आहे. असेच चित्र नेहमी पाहायला मिळे.  सर्व सामान्यांचा आधार म्हणून त्यांचे कार्य अखंड चालू असे. बारामती परिसरातील अनेक नामवंत कर्तृत्ववान मंडळीचे, सायंकाळी संमेलनच त्यांच्या कार्यालयात भरलेले दिसायचे. गुलाबराव पाटील, हरिभाऊ देशपांडे, विनोद शेठ, हिरेमठ काका, भगीरथ पवार अनेक डॉक्‍टर, वकील, तालुक्‍यातील अधिकारी, पदाधिकारी यांचा स्नेहमंडळाचे ठिकाण म्हणून आप्पासाहेबांचे कार्यालय ओळखले जाई. हास्यविनोद, गंभीर विषयांवर चर्चा यांनी सर्वजण मंत्रमुग्ध झालेले दिसत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com