पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर होणार

पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर होणार
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर होणार

पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन वाटचाल ठरविण्यासाठी धोरणात्मक बदल सूचविणाऱ्या "महाराष्ट्र राज्य पंचायत तज्ज्ञ गटा"चा अहवाल लवकरच सादर होणार आहे.

ग्रामविकास मंत्रालयाचे माजी सचिव सुधीर ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पंचायत तज्ज्ञ गटाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. ग्रामविकासातील एक अभ्यासू माजी सनदी अधिकारी म्हणून श्री. ठाकरे यांचा उल्लेख केला जातो. ते सध्या अहवालावर अंतिम हात फिरवित आहेत.

राज्यातील लहान ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकापासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीदेखील मते श्री. ठाकरे यांनी विचारात घेतली आहेत. पुण्यात पुढील काही दिवसांत गटाची अंतिम बैठक आटोपल्यानंतर अहवाल लेखन पूर्ण केले जाणार आहे.

श्री. ठाकरे यांच्यासोबत गटाचे सदस्य म्हणून महाराष्ट्र आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, ग्रामविकासाचे अभ्यासक चंदू पाटील मारकवार, भारत पाटील यांनीदेखील पंचायत राज रचनेचा अभ्यास करीत अनेक शिफारशींना अंतिम रुप देण्याचे काम केले आहे.

ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला वेग देण्यासाठी निश्चित काय बदल करावेत यासाठी तज्ज्ञ गटाकडून गेल्या दीड वर्षापासून राज्यभर बैठका घेतल्या जात आहेत. या गटाच्या शिफारशीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यात बदल केले जाणार असल्यामुळे या संस्थांमधील सर्वच घटकांचे लक्ष आता अंतिम अहवालाकडे लागून आहे.  

या गटातील प्रशासकीय अधिकारी अजय सावरीकर म्हणाले, की तज्ज्ञ गटाकडून राज्यभर सुरू असलेल्या बैठका व त्यातून मांडल्या जात असलेल्या ग्रामविकासविषयक मतांचे संकलन करण्याची जबाबदारी पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात ''यशदा''वर सोपविण्यात आली होती. आता पुढील काही दिवसांमध्ये गटाचे काम समाप्त होणार असून राज्याच्या ग्रामविकास विभागाला अहवाल सादर केला जाणार आहे.

राज्यात सध्या झेडपी, पंचायत समित्या एका कायद्यात असून ग्रामपंचायतीला वेगळा कायदा आहे. अनेक राज्यांत जिल्हा परिषद-पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती मिळून एकच कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तज्ज्ञ गटाकडून नेमके काय सुचविले जाते यावर ग्रामपंचायतींचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

राज्यातील या तीनही महत्त्वाच्या संस्थांना कायद्याच्या एकाच धाग्यात बांधून पंचायत राज संस्थांचा फक्त एकच अधिनियम असावा का, नामधारी पंचायत समित्यांना काढून टाकावे की बळकट करावे, असे मुद्दे गटाच्या अहवालात हाताळले जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षापासून "महाराष्ट्र राज्य पंचायत तज्ज्ञ गट" अखंडपणे काम करीत आहे. आम्ही तीनही सदस्यांनी मानधन न घेता फक्त अभ्यासावर भर दिला. राज्यातील सर्व घटकांची मते घेतली आहेत. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी गटातील सर्व सदस्यांची धडपड कौतुकास्पद आहे. गटाचा अहवाल राज्य व केंद्र शासनाला लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. - चंदू पाटील मारकवार, ग्रामविकासाचे अभ्यासक व गटाचे सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com