कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका क्लिकवर

कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका क्लिकवर
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका क्लिकवर

मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन आता डिजिटल स्वरूपात वेबसाइटवर झळकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हव तेव्हा संशोधनाशी निगडित सर्व गोष्टी अगदी घरबसल्या ऑनलाइन पाहता येणार आहेत. सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यात बाजी मारली असून, उर्वरित तिन्ही कृषी विद्यापीठांना त्यासाठी निश्चित कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांची संशोधनेसुद्धा संबंधित विद्यापीठांच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.  शासकीय कारभार, सेवा ऑनलाइन, पारदर्शक असाव्यात याकडे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांचा कल आहे. त्यासोबतच कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांना घरबसल्या चोवीस तास ऑनलाइन उपलब्ध असावे, यासाठी ते आग्रही आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त असतानाही त्यांनी याकामी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यावेळी विद्यापीठांच्या स्तरावरील उदासीनतेमुळे डिजिटलीकरणाला मूर्त स्वरूप येण्यास अपेक्षित सहकार्य मिळाले नव्हते. आता कृषी खात्याच्या सचिवपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सचिव श्री. डवले यांनी पुन्हा या कामाला गती देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर इतके दिवस चालढकल करणाऱ्या विद्यापीठांना नाईलाजाने का असेना डिजिटलीकरणास सुरवात केली आहे. काही विद्यापीठांना ही संकल्पना आवडली, त्यांनी तातडीने या कामाला सुरवात केली. मात्र, काहींमध्ये अद्यापही निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.  राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, (जि. अकोला), मराठवाडा कृषी विद्यापीठ, (जि. परभणी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, (जि. रत्नागिरी) ही चार कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांनी विविध जातींच्या शेकडो वाणांचे संशोधन केले आहे. पशूंच्या संशोधनाचाही यात समावेश आहे. कृषी तसेच पूरक क्षेत्रात कार्यरत खासगी कंपन्या, संस्था स्वतःच्या संशोधनांची माहिती डिजिटल स्वरूपात वेबसाइटवर झळकावून त्याचे प्रभावीपणे मार्केटिंग करतात. मात्र, कृषी विद्यापीठांच्या संशोधनाशी निगडित कोणतीच माहिती वेबसाइटवर एका क्लिकसरशी एकसंघ पाहायला मिळत नाही, ही उणीव ओळखून हे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय पातळीवरूनही आतापर्यंत याअनुषंगाने कधी विचारणा झाली नसल्याने विद्यापीठांनीही स्वतःहून त्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. मात्र, आता मंत्रालय स्तरावरूनच दट्ट्या आल्याने विद्यापीठांनी हालचाली सुरू केल्या आहेत.  त्यामुळे केवळ संबंधित विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना अगदी घरबसल्या विद्यापीठांच्या संशोधनाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या माहितीचा वापर लागवडीसोबतच पीक व्यवस्थापन आदी बाबी समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. येत्याकाळात उर्वरित तीन कृषी विद्यापीठांचेही सगळे संशोधनही शेतकऱ्यांना ऑनलाइन एका क्लिकवर पाहायला मिळेल, अशी आशा आहे.  शेतकऱ्यांनाही माहिती मिळणार दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेबसाइटवर संशोधन या माहितीखाली पीकनिहाय संशोधन तसेच पीकनिहाय शिफारशींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पीक संशोधनात वाणाचे नाव, प्रसारित केल्याचे वर्ष, जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचा कालावधी, प्रतिएकर लागणारे बियाणे, पीक व्यवस्थापन, पिकाचा कालावधी, उत्पादकता, वाणाची वैशिष्ट्ये-विशेष गुणधर्म, वाणासंबंधी छायाचित्रे आदी इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पीक शिफारशींमध्ये पीक-वाणाचे नाव, वर्ष, खत व्यवस्थापनाबद्दलच्या शिफारशी, पीक व्यवस्थापनाबद्दलच्या इतर शिफारशी, लागवडीविषयी तंत्रज्ञान व शिफारशी, पाणी व्यवस्थापनाबद्दलच्या शिफारशी, कीड व रोग व्यवस्थापन आदींबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. पशुधनाच्या बाबतीत संबंधित पशूची शारीरिक, प्रजनन, जातीची ठळक वैशिष्ट्ये, दूध उत्पादन व दुधातील घटक, तसेच छायाचित्रे आदी माहिती देण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com