परतीच्या पावसाचा सोयाबीन, कपाशीला फटका

निपानी जि. औरंगाबाद : परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी दत्तात्रय भालेकर यांच्या शेतातील वेचणीला आलेला कापूस भीजला असून शेतात पाण्याचे तळे साचले आहे. (छायाचित्र : दिनेश शिंदे)
निपानी जि. औरंगाबाद : परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी दत्तात्रय भालेकर यांच्या शेतातील वेचणीला आलेला कापूस भीजला असून शेतात पाण्याचे तळे साचले आहे. (छायाचित्र : दिनेश शिंदे)

औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठवाड्यात प्रदीर्घ खंडातून वाचलेल्या आणि आता काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकासह मका व कपाशीचे परतीचा पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान मंगळवारीही (ता. १०) बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. यंदा मराठवाड्यात ४६ लाख ७५ हजार ४२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची; तर त्यापाठोपाठ कपाशीचे क्षेत्र आहे. १५ लाख ५९ हजार ७४४ हेक्‍टरवर कपाशी, तर १६ लाख ४८ हजार ५९८ हेक्‍टरवर सोयाबीनचे क्षेत्र आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना या चारच जिल्ह्यांत प्रत्यक्षात यंदाच्या सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन खरिपाची पेरणी झाली. सुरवातीच्या काळात काही भागांत पंधरवडा ते महिनाभरापेक्षा जास्त काळ पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पिकावर संकट ओढावले. बहुतांश शेतकऱ्यांवर पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पीक मोडण्याची वेळ आली होती. या संकटातून सावरल्यानंतर काही पदरी पडेल ही आस लावून असलेल्या मराठवाड्यातील सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर परतीचा पाऊस पाणी फेरत असल्याचे चित्र आहे.

संपूर्ण पावसाळ्याच्या तुलनेत काही भागांत जोरदार ते अतिजोरदार प्रमाणात बरसत असलेल्या या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला होत असून, काढणीला आलेल्या सोयाबीनची पसरही भिजत आहे. त्यामुळे कसाबसा हातातोंडाशी आलेला घासही हिरवला जातो की काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

जोरदार पाऊस झालेल्या क्षेत्रांमध्ये वापसाच होत नसल्याने रब्बी पेरण्यांनाही या पावसाने काही प्रमाणात ब्रेक लावल्याचे चित्र आहे. यंदाच्या खरिपात १० लाख ३८ हजार ८९० हेक्‍टरच्या तुलनेत १६ लाख ४८ हजार ५९८ हेक्‍टरवर अर्थात सरासरी क्षेत्राच्या १५८ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरसह बीड, जालना जिल्ह्यांत मंगळवारी दुपारपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम होती. दरम्यान सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतही मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोटसह बीड जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव, परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील देऊळगाव, नांदेड जिल्ह्यातील कुरूंला, बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, शिरूर ता. मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेतली गेली होती.

सहा मंडळांत अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यातील तीन मंडळांसह जालना, हिंगोली व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका मंडळात मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिवृष्टीची नोंद घेतली गेली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मंडळात ६७ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत मंडळात ७२ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड मंडळात ७० मिलिमीटर, पेठवडज ७२ मिलिमीटर, मुक्रमाबाद ७० मिलिमीटर, तर लातूर जिल्ह्यातील अंधोरी मंडळात ६६ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्‍यात सरासरी ५३ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ   तालुक्‍यात सरासरी ४४.२५ मिलिमीटर पाऊस झाला. जवळपास ३८ तालुक्‍यांत सरासरी १२ ते ४० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com