परतीच्या पावसाने ऊस उत्पादकांना दिलासा

जोरदार पावसाने दक्षिण महाराष्ट्रातील उसाच्या सरींत असे पाणी साचून राहिले आहे.
जोरदार पावसाने दक्षिण महाराष्ट्रातील उसाच्या सरींत असे पाणी साचून राहिले आहे.

कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात दक्षिण महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसाने हुमणी व अल्प पावसामुळे हताश झालेल्या ऊस उत्पादकांच्या दिलासा मिळाला आहे. उसाची वर्षभराची तहान पंधरवड्याच्या पावसाने भागविल्याने बहुतांशी ठिकाणी उसाच्या सरी पाण्याने भरल्या असून, उसाची वाढ चांगली होण्याची शक्‍यता आहे. अंतिम टप्प्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने एकरी तीन ते चार टनांपर्यंत उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

पंधरा दिवसांत चित्र पालटले सप्टेंबरच्या मध्यापर्यंत उपलब्ध पाणी देऊनही उसाची शिवारे तहानलेली होती. केवळ ढगाळ हवामान व वाढत्या आर्द्रतेमुळे हुमणीने उसाचे शिवार गिळंकृत करण्यास प्रारंभ केला होता. माळावरची व नदीकाठी दोन्हीकडे आढळणाऱ्या हुमणीने उच्छाद मांडला होता. कितीही औषधे फवारणी केली तरीही ही कीड आटोक्‍यात येत नव्हती. यामुळे नैसर्गिक पद्धतीनेच संपूर्ण कीड नियंत्रण यायची झाली तर सऱ्या भरण्याइतका पाऊस होणे गरजेचे असल्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता.

जोरदार पावसाने हुमणी नियंत्रणात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या ऊस पट्ट्यात अनेक ठिकाणी सातत्यपूर्ण पाऊस झाला. सलग दोन तीन दिवस १० मिलिमीटरपासून ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्याने उसाचे पाट पाण्याने गच्च भरले. एक-दोन दिवसांच्या खंडाने सातत्याने पाऊस पडत असल्याने पाटातील पाणी कमी झाले नाही. याचाच सकारात्मक परिणाम हुमणी कमी होण्यावर झाला आहे. पाणी साचून राहिल्याने अनेक शिवारांत हुमणी पाण्यावर तरंगत असल्याचे दृश्‍य आहे.  

तीन ते चार टन उत्पादनवाढीची शक्‍यता सध्या गळीत हंगाम तोंडावर असल्याने साखर कारखाने हंगामाचे नियोजन करण्यात व्यग्र आहेत. एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे अद्याप हंगाम सुरू व्हायला तब्बल एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. पुन्हा पाऊस न झाल्यास सध्या झालेला पाऊस हा तोडणीस आलेल्या उसासाठी लाभदायक ठरू शकतो. याबरोबर वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या उसालाही हा पाऊस दिलासा देणारा ठरणारा असल्याने आमच्या विभागात उत्साह असल्याचे कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आणखी पाऊस ठरू शकतो नुकसानकारक

आतापर्यंत झालेला पाऊस हा उपयुक्त ठरला असला, तरी पुन्हा पाऊस झाल्यास व त्यात सातत्य राहिल्यास अतिपावसाने उसाची वाढ रोखली जाण्याची भीती आहे. विशेषकरून काळ्या जमिनीत हा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो. काही ठिकाणी उसाची पडझड झाली असली तरी हे नुकसान वगळता बहुतांशी ठिकाणी हा पाऊस उसाला उपयुक्तच ठरल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com