दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल वसुली

दुष्काळ
दुष्काळ

जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त झाला आहे. परंतु हा निधी वितरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना महसुली कर्मचारी किंवा तलाठी दुष्काळी तालुक्‍यांमध्येही शेतसारा वसुली करीत आहेत. पात्र शेतकऱ्यांनी शेतसारा भरला का, असा प्रश्‍न कर्मचारी विचारत आहेत.  दुष्काळ निधी जमा करण्यासाठी शासकीय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला गतीने काम करण्याच्या सूचना पालकमंत्री, संबंधीत आमदार मंडळींनी केल्या आहेत. प्रथम दुष्काळ निधी याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करा, अशा सूचना तलाठी व इतर महसुली कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशसानातील वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्या दृष्टीने तलाठी मंडळी गावोगावी सकाळीच या यादीसंबंधी कार्यवाहीसाठी पोचत आहेत. शेतकऱ्यांकडून पुन्हा त्यांचे सातबारा उताऱ्याबाबतचे गट क्रमांक, बॅंक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्‍स गोळा केली जात आहे. तलाठी कार्यालयात यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. परंतु ही कागदपत्रे स्वीकारण्यापूर्वी शेतसारा भरला का, असा प्रश्‍न केले जात आहेत. जळगाव, पाचोरा, शिंदखेडा, धुळे, यावल, चोपडा भागात असे प्रकार सर्रास सुरू आहेत.  ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र चार ते पाच हेक्‍टरपर्यंत आहे, त्यांना ३०० ते ४०० रुपये भरावे लागत आहेत. दुष्काळी तालुक्‍यात कर्जवसुलीसह शेतसारा वसुली करू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत, तरीदेखील शेतसारा महसुली कर्मचारी का वसूल करीत आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात जळगाव तालुक्‍यातील एका गावात तलाठी व शेतकरी यांच्यात शाब्दिक वादही झाले. एका शेतकऱ्याने तलाठ्याला थेट जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले तर आम्ही शेतसारा भरू, असे सुनावले. नंतर गावातील पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटविला. हे वाद अनेक ठिकाणी सुरू असून, संबंधित जिल्हा प्रशासनाने लेखी स्वरूपात ग्रामपंचायती, तलाठी कार्यालयांमध्ये शेतसारा वसुली करू नये, अशा सूचना द्याव्यात. याचे आदेश संबंधित कार्यालयात दर्शनी भागात चिपकवावेत, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी ॲग्रोवनशी बोलताना उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com